पालघर : सार्वजनिक बांधकाम विभागातील ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी जव्हार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र शाहिग्राम पवार यांच्यासह अशोक माळगावी आणि एकनाथ वांगड या तिघांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामांच्या देयकांमध्ये फेरफार करून ७३ लाख १३ हजार 884 रुपयांचा कथित अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, विक्रमगड येथील मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून शासकीय निधीचा कथित अपहार झाल्याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.