नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच वऱ्हाडावर मृत्यूचा घाला! पालघरमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीही चिरडली; १३ ठार, २५ गंभीर  
मुंबई

नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच वऱ्हाडावर मृत्यूचा घाला! पालघरमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीही चिरडली; १३ ठार, अनेक जखमी

आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीही चिरडली गेली. या भीषण दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.

Krantee V. Kale

नितीन बोंबाडे / पालघर

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानीवरी येथे सोमवारी (१८ मे) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीही चिरडली गेली. या भीषण दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.

डहाणू तालुक्यातील बापुगाव येथील लाखातपाडा परिसरातील जयराम दांडेकर यांच्या कुटुंबातील साखरपुड्याचे वऱ्हाड आयशर ट्रकमधून धानीवरी खडकीपाडा येथे जात होते. ट्रकमध्ये ५० हून अधिक नागरिक प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. नवरीच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच धानिवरी परिसरात समोरून येणाऱ्या कंटेनरची आयशर ट्रकला जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीलाही या वाहनांनी चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोन प्रवाशांसह ट्रक मधील १० अशा १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच काळ अनेक प्रवासी ट्रकमध्ये अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वेदांत, सिल्वासा आणि वापी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक मृत व्यक्तीमागे पाच लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

मृतांची नावे अशी आहेत-    सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, कल्लू गोविंद लाखात,सुनील अर्जुन दांडेकर, चित्रा गोविंद कुर्हाडा, नमिता विठ्ठल दांडेकर,सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदनाशिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय आहाडी, रियांशु संतोष लाखात.या भीषण दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कंटेनरखाली दबले वऱ्हाडी, दुचाकीवरील दोघेही ठार

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा पुढचा केबिनचा भाग मुख्य बॉडीपासून वेगळा झाला आणि तो थेट वऱ्हाडाच्या आयशर ट्रकवर जाऊन कोसळला. त्यामुळे ट्रकमध्ये बसलेले अनेक लोक कंटेनरच्या वजनाखाली दबले गेले. त्यातच एक दुचाकीही या वाहनांच्या कचाट्यात आली आणि दुचाकीवरील दोघांचा जागीच चेंदामेंदा झाला.

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

आजचे राशिभविष्य, १९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गाजर-कोथिंबीर ज्यूसने वाढेल इम्युनिटी; जाणून घ्या सोपी रेसिपी

स्वयंनियमनाचे आवाहन आणि पोटशूळ

मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना