MSRTC Chhava Ride : एकाच ॲपवर मिळणार एसटी, ऑटो, टॅक्सीची सुविधा! 'छावा राईड' लाँचच्या दिशेने मोठं पाऊल; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र सरकारच्या 'छावा राईड' ॲपच्या दिशेने मोठं पाऊल पडले आहे. एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा देण्यासाठी MSRTCने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. जाणून घ्या या प्रकल्पाची संपूर्ण माहिती.
MSRTC Chhava Ride : एकाच ॲपवर मिळणार एसटी, ऑटो, टॅक्सीची सुविधा! 'छावा राईड' लाँचच्या दिशेने मोठं पाऊल; जाणून घ्या सविस्तर
MSRTC Chhava Ride : एकाच ॲपवर मिळणार एसटी, ऑटो, टॅक्सीची सुविधा! 'छावा राईड' लाँचच्या दिशेने मोठं पाऊल; जाणून घ्या सविस्तर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. भविष्यात एसटी बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस यांसारख्या विविध वाहतूक सेवांचा लाभ एकाच मोबाईल ॲपवर घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) महत्त्वाकांक्षी 'छावा राईड' (Chhava Ride) प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग आला असून, हे ॲप विकसित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी MSRTCने अधिकृत निविदा (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे.

काय आहे 'छावा राईड' ॲप?

'छावा राईड' हे केवळ कॅब बुकिंग ॲप नसून राज्यातील विविध सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न आहे. या ॲपमुळे प्रवाशांना वेगवेगळे ॲप वापरण्याऐवजी एकाच ठिकाणी अनेक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या प्लॅटफॉर्मवर पुढील सेवा उपलब्ध असतील:

  • एसटी बस

  • ऑटो रिक्षा

  • टॅक्सी

  • ई-बस

कोणत्या सुविधा मिळणार?

'छावा राईड' ॲपमध्ये प्रवासी आणि चालकांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप असणार आहे. तसेच,

  • वाहन पडताळणी

  • ऑनलाइन पेमेंट

  • जीपीएस आधारित लाईव्ह ट्रॅकिंग

  • भाडे व्यवस्थापन

  • तक्रार निवारण व्यवस्था

  • ग्राहक सेवा

  • रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर

यांसारख्या सुविधाही उपलब्ध असतील. हा प्लॅटफॉर्म केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या मोटार वाहन ॲग्रीगेटर धोरणानुसार विकसित केला जाणार आहे.

कंपनीची निवड कशी होणार?

'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, MSRTCने या प्रकल्पासाठी अनुभवी तंत्रज्ञान कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. निवड झालेली कंपनी ॲप विकसित करणे, ते लॉन्च करणे तसेच त्याचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी सांभाळणार आहे.

या प्रकल्पासाठी एक वर्ष विकासाचा आणि त्यानंतर पाच वर्षे संचालनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आवश्यक असल्यास हा करार आणखी दोन वर्षांनी वाढवता येणार आहे.

प्रत्येक राईडवर किमान ५ रुपयांचे शुल्क

निविदेनुसार, 'छावा राईड' प्लॅटफॉर्मवर प्रत्येक राईडसाठी किमान ५ रुपयांचे प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाणार आहे. किमान शुल्कापेक्षा अधिक महसूल वाटा (Revenue Share) देणाऱ्या कंपनीला करारासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

कंपन्यांना द्यावे लागणार लाईव्ह डेमो

या टेंडरमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाची क्षमता, स्केलेबिलिटी, रिस्क मॅनेजमेंट आणि प्रोटोटाइपचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Live Demo) सादर करावे लागणार आहे. तांत्रिक चाचणीत पात्र ठरलेल्या कंपन्यांच्याच आर्थिक प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ५ ऑगस्ट २०२६

  • तांत्रिक प्रस्ताव उघडण्याची तारीख - ७ ऑगस्ट २०२६

  • अनामत रक्कम (EMD)- ५० लाख रुपये

  • टेंडर शुल्क - ५ लाख रुपये

गेल्या वर्षी झाली होती घोषणा

'छावा राईड' ॲपची घोषणा राज्य सरकारने गेल्या वर्षी केली होती. आता या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष टेंडर प्रक्रिया सुरू झाल्याने ॲपच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीची निवड होईल आणि त्यानंतर हे ॲप विकसित करून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in