Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video (Photo- Instagram)
मुंबई

Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video

राजकीय व्यासपीठावर आपल्या कामामुळे ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा यावेळी मात्र वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : राजकारणातील नेतेमंडळी एखाद्या वेगळ्या अंदाजात दिसली की सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. त्यात एखाद्या महिला मंत्र्याने थेट मॉडेलप्रमाणे रॅम्प वॉक केला तर आश्चर्य वाटणारच! सध्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. राजकीय व्यासपीठावर आपल्या कामामुळे ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा यावेळी मात्र वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी चक्क रॅम्प वॉक करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.

मुंबईतील ग्रँड हयात येथे आयोजित बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये 'वॉक फॉर अ कॉज' या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जबाबदार जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रांनी एकत्र येणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी प्रमुख सीईओ, उद्योगपती आणि व्यावसायिकही एकत्र आले होते. त्यांच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या या अनोख्या अंदाजाची चर्चा रंगली आहे.

रॅम्प वॉकचा उद्देश

पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या रॅम्प वॉकमागील भूमिका स्पष्ट केली आहे. "मला मॉडेलप्रमाणे रॅम्प वॉक करायचा नव्हता, तर हॅण्डलूमला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हायचे होते," अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी 'जालनाई सिल्क' (Jalnai Silk) ही पारंपरिक हॅण्डलूम साडी परिधान केली होती.

या कार्यक्रमात Reduce, Reuse & Recycle म्हणजेच वस्तूंचा वापर कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रण करणे या तत्त्वांवर भर देण्यात आला. तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांच्या सीएसआर (CSR) उपक्रमांचा वापर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, नवीन प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवा-पाण्याची स्वच्छता राखण्यासाठी करावा, असे आवाहन करण्यात आले.

याच मंचावर 'जालनाई सिल्क'चा विशेष प्रचार करण्यात आला. यामुळे पर्यावरणपूरक कापडाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच जालन्यातील स्थानिक शेतकरी आणि कारागिरांनाही आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. उद्योग क्षेत्राचे नेतृत्व, प्रादेशिक कला आणि सार्वजनिक जनजागृती यांच्या माध्यमातून समृद्ध भविष्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा संदेशही त्यांनी दिला.

पारंपरिक हॅण्डलूम साडीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी स्थानिक कला आणि कारागिरांच्या कामाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा हा रॅम्प वॉक केवळ फॅशनपुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक हस्तकलेचा संदेश देणारा ठरला आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय; ५५७ प्रवासी क्षमता; ताशी २४९ किमी वेग, बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर