मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) विविध मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांच्या (एमयूटीपी) कामांना जुलै महिन्यात मोठी गती मिळाली आहे. त्यानुसार पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिका वर्षअखेरीस सुरक्षा तपासणीसाठी सज्ज होणार आहे. २०२६ च्या अखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा तपासणीसाठी तयार होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाने एमआरव्हीसीच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार अधिकृत भागभांडवल २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये, तर भरलेले भागभांडवल २५ कोटींवरून २२५ कोटी रुपये करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एमआरव्हीसीची आर्थिक क्षमता वाढणार आहे.
सिग्नलिंगची विश्वासार्हता वाढणार
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत वाणगाव-डहाणू विभागातील आरओबी आणि लघुपूल क्रमांक १३३ पूर्ण करण्यात आला. केळवे रोड स्थानकात पहिल्या टप्प्यातील सिग्नलिंग व दूरसंचार कामे १५ जुलैला कार्यान्वित केली. त्याच दिवशी सफाळे-केळवे रोडदरम्यान अप व डाऊन मुख्य मार्गावर स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणाही सुरू करण्यात आली तसेच रिले हट क्रमांक ३ व ४ मध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित केली.
डोंबिवली ते नालासोपारापर्यंत गर्डर लॉन्चिंग
जुलैमध्ये वाहतूक आणि विद्युत ब्लॉकचे नियोजन करून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्डर लॉन्चिंगची कामे करण्यात आली. डोंबिवली येथे ९ आणि १० जुलैच्या मध्यरात्री ६.५ मीटर रुंद आणि ५४ मीटर लांबीच्या स्कायवॉकसाठी पाच गर्डर बसवण्यात आले. दहिसर येथे ४ आणि ५ जुलैच्या रात्री ६ मीटर रुंद आणि ६४ मीटर लांबीच्या एफओबीसाठी चार गर्डर लॉन्च करण्यात आले. विरार येथे २१ ते २६ जुलैदरम्यान झालेल्या ब्लॉकमध्ये प्रस्तावित २५ मीटर रुंद आणि सुमारे ३६० मीटर लांबीच्या उन्नत डेकसाठी विविध लांबीचे १६ गर्डर बसवण्यात आले.
विविध ठिकाणी गर्डर लॉन्चिंग
भाईंदर येथे २५ जुलैला १० गर्डर, तर नालासोपारा येथे ३० आणि ३१ जुलैच्या मध्यरात्री उन्नत डेकच्या कामासाठी सात गर्डर लॉन्च करण्यात आले. या कामांमुळे गर्दीच्या स्थानकांवरील प्रवासी वाहतूक आणि पादचारी हालचालीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
भुयारी मार्ग पूर्ण
पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय मार्गिकेच्या कामाला जुलैमध्येही चांगली गती मिळाली. चिखले आणि मोहोपे येथील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आले असून ८९/१ आणि ९०/२ क्रमांकाचे रेल्वे उड्डाणपूल ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले केले आहेत. टनेल क्रमांक १ आणि ३ मधील केबलिंगचे कामही पूर्ण झाले. विद्युतीकरणाच्या कामात जुलै महिन्यात सुमारे ४ किलोमीटर ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) कॅटेनरी वायर, ४ किमी कॉन्टॅक्ट वायर आणि ३२ किलोमीटर ड्रॉपिंग वायर टाकण्यात आली.