सोशल मीडियावर कथित MMS व्हिडिओ प्रकरणामुळे चर्चेत आलेली प्रसिद्ध गेमिंग क्रिएटर पायल गेमिंग (पायल धारे) हिने नववर्ष २०२६ ची सुरुवात अध्यात्मिक वातावरणात केली आहे. गेल्या काही दिवसांतील वाद आणि ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर तिने शांत आणि संयमी भूमिका घेत नव्या वर्षाची सुरुवात श्रद्धा आणि सकारात्मकतेसह करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं.
सिद्धिविनायक दर्शन; सोशल मीडियावर भावूक पोस्ट
अलीकडेच पायलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेत तिने नववर्ष २०२६ ची सुरुवात केल्याचं या पोस्टमधून सांगितलं आहे. "बाप्पाच्या सोबतीने २०२६ या नववर्षाची सुरुवात करण्यास सज्ज" अशी भावना व्यक्त करत तिने मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतानाचे काही फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कथित MMS प्रकरणानंतर चर्चेत
गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित १९ मिनिटांच्या MMS व्हिडिओशी पायल गेमिंगचं नाव जोडण्यात आलं. या व्हिडिओतील तरुणी पायल असल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आला. मात्र अनेक नेटकर्यांनी हा व्हिडिओ AI डीपफेक असल्याची शक्यता व्यक्त केली.
पायल गेमिंगने आरोप फेटाळले
या संपूर्ण प्रकरणावर पायलने स्पष्ट भूमिका घेतली. १७ डिसेंबर रोजी तिने सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं, “इतक्या वैयक्तिक आणि त्रासदायक विषयावर मला सार्वजनिकपणे बोलावं लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. डिजिटल प्लॅटफॉर्मवर फिरत असलेल्या त्या व्हिडिओशी माझं नाव आणि फोटो चुकीच्या पद्धतीने जोडले जात आहेत. मी ठामपणे सांगते- त्या व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही आणि त्याचा माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही.” तिने पुढे नमूद केलं की, “हा कंटेंट केवळ खोटा नाही, तर तो अमानवीय, अपमानास्पद आणि मानसिक त्रास देणारा आहे. केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर अशा प्रकारच्या ऑनलाइन हल्ल्यांना सामोऱ्या जाणाऱ्या असंख्य महिलांसाठी मला बोलणं गरजेचं वाटलं.”
ऑनलाइन गेमिंगमधील मोठं नाव
पायल गेमिंगचं खरे नाव पायल धारे आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा (इंदूरजवळ) येथील रहिवासी असलेली पायल ऑनलाइन गेमिंग विश्वातील आघाडीची महिला इन्फ्लुएंसर आहे. तिचे YouTube वर ४.५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर ४.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. BGMI, PUBG, Call of Duty, GTA V यांसारख्या गेम्ससाठी ती विशेष ओळखली जाते. गेमिंगसोबतच ती लाइफस्टाइल कंटेंटही तयार करते. तिने फराह खान आणि समांथा रूथ प्रभू यांच्यासोबतही काम केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही घेतली होती भेट
गेल्या वर्षी पायल गेमिंगने इतर भारतीय गेमर्ससोबत नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भारतातील गेमिंगच्या भविष्यासंदर्भात झालेल्या या चर्चेत पायल एकमेव महिला गेमर होती. त्यावेळी ती म्हणाली होती, “मी भारतातील आघाडीची महिला इन्फ्लुएंसर बनेन, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.”