मुंबई : राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांच्या निराकरणासंदर्भात बुधवारी भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका सध्या अडचणीचा सामना करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कडक निकषांमुळे त्यांच्यावर अनेक प्रकारच्या व्यवहारांवर बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा, या एकमेव उद्देशाने आमदार प्रविण दरेकर यांच्या विनंतीवरून बुधवारी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सहकारी बँकांपुढील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शासनाकडून नेमकी कोणती मदत अपेक्षित आहे. यासंदर्भात शासनाचे धोरण काय असावे, सहकार कायद्यात नेमक्या काय दुरुस्त्या कराव्यात यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी वळसे-पाटील यांनी राज्य शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल आणि राज्यातील नागरी सहकारी बँकांना अडचणीतून बाहेर काढेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी आणि या समितीने लवकरात लवकर आपला अभ्यास अहवाल शासनाला सादर करावा असा निर्णय घेण्यात आला.