मुंबई : मुंबई महानगरपालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्यामुळे झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खाद्यपदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मनपाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ बुधवार, ५ मार्च २०२५ पासून करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, झोमॅटोचे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून पालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे.
महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण
बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच स्व:रक्षणाचे धडे दिले आहेत. यासोबतच मोबाईल ॲपद्वारेही या महिलाप्रसंगी गरज भासल्यास आपत्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.
भारतातील पहिलीच महानगरपालिका
झोमॅटोसोबत अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका आहे. या उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सुरुवातीला महानगरपालिकेच्या टी विभागात म्हणेच मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू होत आहे. यानंतर इतर सर्व विभागांमधील (वॉर्ड) बचत गटातील महिलांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती
‘प्रोजेक्ट आर्या’मध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो ॲपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.