मुंबई : पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या मरीन ड्राईव्हच्या ‘क्वीन नेकलेस’ परिसरातील पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा ‘क्वीन नेकलेस’चा पदपथ नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, सुंदर असा जी डी सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा १० जून रोजी खुला करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठीचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या भागात पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मरीन ड्राईव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यामुळे १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नलदरम्यानचा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा अंतराचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अस्तित्वातील फुटपाथचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील सरासरी १ किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येईल. अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी ही बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजूला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे.
लाटांचा वेग रोखण्यासाठी टेट्रापॉडची भिंत!
मरीन ड्राईव्हच्या सी-फेस परिसरात धडकणाऱ्या लाटांचा वेग आणि आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर किनारपट्टीवर करण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर टेट्रापॉडचा वापर करून लाटांमुळे किनारपट्टीवर होणारा आघात तसेच लाटांचा वेग कमी करण्यासाठी मदत होईल. मरीन ड्राईव्ह किनारपट्टीवर ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत प्रगतिपथावर आहे.
सुसज्ज आसन व्यवस्था
पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय पदपथांना लागूनच चांगली प्रकाशव्यवस्था तयार करण्यासाठी पथदिवे उभारणी नियोजनाचे काम प्रगतिपथावर आहे.