मुंबई : मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मनसेच्या मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. या सर्व घडामोडीनंतर आता राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये सभा होणार आहे. “ज्या मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठीजनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली. त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात बुलंद आवाज आज घुमणार आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की या,” अशी पोस्ट मनसेने समाजमाध्यमांवर टाकली आहे.