मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तिच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीत राच्या अंगणापासून ते उंबरठ्यापर्यंत रंगीबेरंगी रांगोळीने सजावट करण्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे बाजारात दिवाळीच्या रांगोळीला मोठी मागणी कायम आहे. विविध वस्तूंच्या किमतीत महागाईमुळे वाढ झालेली असली तरीही घाऊक बाजारात रांगोळीचे दर स्थिर आहेत.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. काळानुरूप रांगोळीची जागा विविध डिझाईनचे स्टिकर्स घेत असले तरी आजही बहुतांश लोक दिवाळीत घरासमोर आकर्षक रांगोळी काढतात. दरवर्षी सणाच्या तयारीत रांगोळीची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. पारंपरिक रांगोळीपासून विविध रंगांच्या बारीक रांगोळीपर्यंत अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये
मार्बलच्या तुकड्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या रांगोळीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. रांगोळी राजस्थानमधून मुंबईत आणली जाते. यंदा रांगोळीच्या वाहतुकीसह इतर खर्चात टनामागे सुमारे ८०० रुपयांची वाढ झाली आहे. तरीही घाऊक दुकानदारांनी विक्रीचे दर कायम ठेवले आहेत. होलसेल बाजारात रांगोळी २० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. धारावीतील घाऊक दुकानदार किलोमध्ये रांगोळीची विक्री करत आहेत. एक, पाच ते दहा किलोमध्ये रांगोळीची विक्री होते. अनेक लहान दुकानदार धारावीतील दुकानांकडून रांगोळी खरेदी करून त्याची लहान पाकिटामध्ये विक्री करतात.
रांगोळी काढण्यासाठी महिला सध्या विविध पुस्तक, युट्यूबचा वापर करत आहेत. आपली रांगोळी इतरांपेक्षा अधिक आकर्षक असावी, असेच प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे रांगोळी काढण्यासाठी प्रत्येक महिला झटत असते.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने रांगोळीच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र विक्रीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून आम्ही घाऊक दरात वाढ केलेली नाही. चार-पाच वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात विक्री कमी झाली आहे; परंतु खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.विनोद टाक, रांगोळी विक्रेते