(Photo- https://www.mcgm.gov.in/)
मुंबई

बंडोबा झाले थंड, काही प्रभागांत मात्र बंडखोरी

मुंबईत २२७ प्रभागांसाठी २,२३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत अपक्षांसह बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत २,८६९ जागांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मुंबईत २२७ प्रभागांसाठी २,२३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत अपक्षांसह बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला डावलून काही प्रभागांत बंडखोरी कायम असल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सांगण्यात आले. प्रभाग क्रमांक २२५ मध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना यश आल्याने त्या प्रभागात भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुजाता सानप आहेत. त्यामुळे या प्रभागात भाजप विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.

याच प्रभागात भाजपचे कमलाकर दळवी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले. भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता राम नगीना यादव यांनी प्रभाग क्रमांक एकमधून बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. येथून महायुतीच्या उमेदवार म्हणून रेखा यादव लढत आहेत. दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माजी नगरसेविका सुनीता यादव यांचे मन वळवण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे.

मुंबईतील २२७ प्रभागात यंदाच्या निवडणुकीत रंगतदार सामना होणार आहे. त्यापैकी एक प्रभाग म्हणजे मुलुंड येथील १०६ प्रभाग, याठिकाणी मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यवान दळवी आणि भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे आहेत. याच प्रभागातून ठाकरे सेनेचे मुलुंड विधानसभा अध्यक्ष अँड. सागर देवरे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने नाराज देवरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. परंतु देवरे यांची समजूत काढण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले असून देवरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे सेना व भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

प्रभाग क्रमांक १७३ मधून भाजपकडून वैशाली पगारे यांनी प्रतिक्षानगर प्रभाग क्रमांक १७३ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या आदेशानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले. या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या पूजा रामदास कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कुर्ल्यातील प्रभाग क्रमांक १५९ मधून भाजपकडून प्रकाश मोरे निवडणुकीसाठी उभे असून उत्तर भारतीय युवा मोर्चाचे महासचिव वकील विरेंद्र दुबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र त्यांनीही अर्ज मागे घेतला.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

Mumbai : दादरमध्ये BEST बसचा भीषण अपघात; एकामागोमाग एक वाहनांना दिली धडक; एकाचा मृत्यू, Video

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार