मुंबई

बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रकरण : "माझ्या पत्नी-बहिणीला पाकिस्तान, यूएई, बांगलादेशहून धमक्या"; समीर वानखेडेंचा गंभीर आरोप

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी गंभीर आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पाकिस्तान, यूएई आणि बांगलादेशहून द्वेषपूर्ण व धमकीचे मेसेज येत आहेत.

नेहा जाधव - तांबे

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी गंभीर आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पाकिस्तान, यूएई आणि बांगलादेशहून द्वेषपूर्ण व धमकीचे मेसेज येत आहेत. रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि नेटफ्लिक्सविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यानंतर हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. समीर वानखेडे यांनी या धमक्यांबाबत पोलिसांना माहिती दिली असून सर्व पुरावे संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले आहेत.

कुटुंबावर हल्ले थांबवा

शनिवारी (दि. ११) पत्रकारांशी बोलताना समीर वानखेडे यांनी सांगितले, "माझ्या कुटुंबाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा माझ्या पत्नी आणि बहिणीला त्रास दिला जात आहे. त्यांना का लक्ष्य केलं जातंय? माझ्यामुळे त्यांना त्रास व्हावा, हे मी कधीच सहन करणार नाही."

हा प्रसिद्धीचा मुद्दा नाही, सन्मानाचा प्रश्न आहे

ते म्हणाले, "ही गोष्ट माझ्या नोकरीशी संबंधित नाही. हा माझ्या सन्मान, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. व्यंगचित्र किंवा विनोद करायचा असेल, तर स्वतःवर करा, पण इतरांच्या सन्मानाशी खेळ करू नका. मी भारत सरकारचा निष्ठावान अधिकारी आहे आणि मी कायद्याच्या चौकटीतच काम केलं आहे. ही प्रसिद्धीची गोष्ट नाही, ही सन्मानाची बाब आहे."

त्यांनी सांगितलं की, आपल्या कुटुंबावर होत असलेल्या अशा द्वेषपूर्ण संदेशांविरोधात ते शेवटपर्यंत न्यायालयात लढा देणार आहेत.

ड्रग्जविरोधी मोहिमेचा अपमान

समीर वानखेडेंनी पुढे म्हटल, "या मालिकेमुळे फक्त माझा नाही, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा आणि ड्रग्जविरोधी मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्वांचा अपमान झाला आहे. देशाच्या अमली पदार्थविरोधी लढ्याला अशा प्रकारच्या चित्रणामुळे धक्का बसतो."

नेमकं प्रकरण काय आहे?

हे प्रकरण नेटफ्लिक्सवरील आर्यन खान संबंधित वेबसीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' याच्याशी संबंधित आहे. या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्या सारखे दिसणारे पात्र दाखवले गेले असून, त्याद्वारे त्यांच्या प्रतिमेची जाणूनबुजून बदनामी करण्यात आल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी समीर वानखेडेंने दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

आर्यन खान अटकेपासून वादात

समीर वानखेडे यांनी २०२१ मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर ते सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले. काही काळानंतर त्यांना NCB मधील पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नेहमीच आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले असून, "आपण फक्त आपलं कर्तव्य केलं," असं ते वारंवार सांगत आले आहेत.

Mumbai : मेट्रो मार्गिका २ए आणि ७ च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान सकाळच्या वेळापत्रकात बदल

रेल्वे अपघातातील मृत व्यक्ती 'प्रामाणिक' प्रवासी; मुंबई हायकोर्टाचा पीडितेच्या कुटुंबियांना दिलासा, नुकसानभरपाईचे आदेश

Pune : AI चा गैरवापर! डेटिंगसाठी तरुणीचा नकार; आरोपीने तयार केले अश्लील फोटो, मैत्रिणींनाही ब्लॅकमेल

हॉस्टेलमध्ये मुलं सुरक्षित आहेत का? लहानग्यांना बॅट, पट्टयाने अमानुष मारहाण; कोल्हापूरमधील रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल

फटाक्यांवर पूर्ण बंदी अशक्य! सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट; दिल्ली-एनसीआरमध्ये हरित फटाक्यांवरील आदेश राखून ठेवला