बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, बिजनेसमॅन राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दोघांविरोधात नोंद असलेल्या ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात आता भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) हे गंभीर कलम जोडले आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. हा गुन्हा मुंबईतील व्यापारी दीपक कोठारी यांच्या तक्रारीनंतर नोंदवण्यात आला आहे.
ED कडे जाण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील रक्कम मोठी असल्याने मुख्य तक्रारदार लवकरच प्रवर्तन संचालनालयाकडे (ED) जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाले, तर या प्रकरणाची मनी लाँड्रिंग दृष्टीनेही तपासणी सुरू होऊ शकते, ज्यामुळे कायदेशीर गुंतागुंत आणखी वाढेल.
यापूर्वी कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल होता?
दीपक कोठारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आधी IPC कलम ४०३ (मालमत्ता अप्रामाणिकपणे गैरवापर) आणि कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासघात) अंतर्गत प्रकरण नोंदवले होते. परंतु, तपासात विश्वसनीय साक्षीदारांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाल्यानंतर EOW ने कलम ४२० जोडले, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली.
तपासात सापडले नवीन पुरावे
ईओडब्ल्यूने (EOW) न्यायालयाला माहिती दिली की, तपासादरम्यान विश्वसनीय साक्षीदारांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यात आले. या पुराव्यांवरुन, तक्रारदाराची ६० कोटींपेक्षा जास्त रकमेची कथित फसवणूक झाल्याचे संकेत मिळत असल्याचे ईओडब्ल्यूने म्हणणे आहे. तसेच, या पुराव्यांच्या आधारे ‘फसवणूक’चे कलम औपचारिकपणे जोडण्यात आले.
नेमकं प्रकरण काय?
१४ ऑगस्ट रोजी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा नोंदवला गेला. तक्रारदार दीपक कोठारी यांनी आरोप केला की, २०१५ ते २०२३ दरम्यान दांपत्याने त्यांना ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ६० कोटी रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले.परंतु, ही रक्कम कंपनीसाठी न वापरता त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी खर्च गेली. हे प्रकरण अखेर ऑगस्ट २०२५ मध्ये उघड झाले.
चौकशीदरम्यान राज कुंद्राचे स्पष्टीकरण
ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या चौकशीदरम्यान कुंद्रा म्हणाले होते की, त्यांची कंपनी इलेक्ट्रिकल आणि घरगुती उपकरणांचा व्यापार करते आणि २०१६ मध्ये केंद्राने लागू केलेल्या नोटबंदीनंतर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आर्थिक संकटामुळे कंपनी कर्ज घेतलेले पैसे परत करू शकली नाही. तसेच, ६० कोटींपैकी काही रक्कम अभिनेत्री बिपाशा बसू आणि नेहा धूपिया यांना फी म्हणून दिली होती. असे राज कुंद्रा यांनी सांगितले.
शिल्पा-राज यांची अद्याप प्रतिक्रिया नाही
या गंभीर आरोपांवर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ईओडब्ल्यूने स्पष्ट केले आहे की, तपास कायद्यानुसार सुरू असून सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.