सिंहगड वैद्यकीय महाविद्यालय बंद होण्याची शक्यता; ६५० MBBS विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी  
मुंबई

Mumbai : सिंहगड वैद्यकीय महाविद्यालय बंद होण्याची शक्यता; ६५० MBBS विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या (एसटीईएस) दोन वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थिती गंभीर असून, या परिस्थितीत ती सुरू ठेवणे शक्य नसल्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाविद्यालयांमधील गंभीर त्रुटींमुळे ती बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सुमारे ६५० एमबीबीएस विद्यार्थ्यांना अन्य मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांत स्थलांतरित करण्याची वेळ येऊ शकते.

उर्वी महाजनी

मुंबई : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या (एसटीईएस) दोन वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थिती गंभीर असून, या परिस्थितीत ती सुरू ठेवणे शक्य नसल्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाविद्यालयांमधील गंभीर त्रुटींमुळे ती बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सुमारे ६५० एमबीबीएस विद्यार्थ्यांना अन्य मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांत स्थलांतरित करण्याची वेळ येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि जनरल हॉस्पिटलमधील शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त करताना, प्राधिकरणे आणि व्यवस्थापन प्रक्रियात्मक बाबी पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना अनिश्चिततेत ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्यावर टांगती तलवार ठेवता येणार नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले.

कमतरता ४९ टक्के

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला कळविले की, २५ नोव्हेंबर रोजी केलेल्या तपासणीत महाविद्यालयात आवश्यक ३१८ अध्यापकांपैकी केवळ १६२ अध्यापक उपस्थित होते. त्यामुळे अध्यापकांची कमतरता जवळपास ४९ टक्के आहे. रुग्णालयात ६०५ कार्यरत खाटा असूनही खाटांची उपलब्धता आणि रुग्णसंख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष खाटांचा वापर केवळ एक टक्का होता. फेब्रुवारी २०२६ पासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे विद्यावेतनही प्रलंबित आहे.

योजना सादर करा

सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलबाबत 'एमयूएचएस'ने सांगितले की, नवीन प्रवेश रोखण्यात आले आहेत; मात्र विद्यमान विद्यार्थ्यांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वेतन थकबाकी आणि आर्थिक हमीशी संबंधित अटींची पूर्तता महाविद्यालयाने केलेली नाही. विद्यमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान न होता अन्य मान्यताप्राप्त संस्थांमध्ये सामावून घेण्यासाठी ठोस योजना सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे.

देणी ४०० कोटींहून अधिक

'एसटीईएस'च्या अखत्यारितील ४४ संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुमारे आठ वर्षांपासून वेतन तसेच निवृत्तीविषयक लाभ न मिळाल्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालय सुनावणी करत होते. थकीत देणी ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी

सोनिया गांधी यांचे नागरिकत्व : पोलिसांचा कोर्टात अहवाल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी