मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात दोन बळी; विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळला, घाटकोपरमध्ये बेस्ट बसच्या अपघातात दोन जखमी

मुंबईत दोन दिवस आधीच डेरेदाखल झालेल्या मान्सूनने रविवारी रात्री जोरदार बॅटिंग केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईत दोन दिवस आधीच डेरेदाखल झालेल्या मान्सूनने रविवारी रात्री जोरदार बॅटिंग केली. विक्रोळी येथे रविवारी रात्री एका इमारतीचा भाग कोसळून १० वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर घाटकोपरमध्ये बेस्ट बस दुभाजकाला धडकल्याने चालकासह दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. पावसाच्या धुवांधार बॅटिंगमुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती.

रविवारी रात्री ९ नंतर रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला. विजेच्या गडगडाटासह संमिश्र पानावर

मुंबईला आज ‘यलो अलर्ट’

मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला मंगळवारी सावधगिरीचा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रालाही उधाण येणार असून दुपारी २.३८ वाजता ३.५४ मीटर, तर ३.४३ मिनिटांनी ४.११ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे गरज असली तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

२४ तासांत झालेला पाऊस

  • मुंबई शहर : १००.९६ मिमी

  • पूर्व उपनगर : ७३.७८ मिमी

  • पश्चिम उपनगर : ६१.२८ मिमी

पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही वेळातच पवई, अंधेरी, बोरिवली, कुर्ला आदी भागांत पाणी साचून रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, मुंबईसह राज्यात पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असून मुंबई, ठाणे, पालघर, कोकण पट्ट्यात रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्ग, तसेच वर्धा, भंडारा, अमरावती अकोला, यवतमाळ आदी भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी गरज असल्यास घरातून बाहेर पडावे, असे आवाहन नागपूर हवामान विभागाने केले आहे.

दरवर्षी ११ जूनपर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा दोन दिवस आधीच म्हणजेच ९ जून रोजी वरुणराजाची एंट्री झाली. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, मात्र रात्री ९ नंतर पावसाची रिपरिप सुरू झाली आणि काही वेळातच विजेच्या गडगडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली. पहिला पाऊस बरसल्याने बच्चे कंपनीसह मुंबईकरांनी भिजण्याचा आनंद लुटला, तर दुसरीकडे पहिल्याच पावसात पडझडीच्या घटनाही घडल्या.

विक्रोळी पश्चिम पार्क साइट, टाटा पॉवर हाऊसजवळील ‘एसआरए’च्या तळ अधिक पाच मजली कैलास बिझनेस पार्कच्या मागील बाजूकडील स्लॅब आणि पत्र्याची शेड रविवारी रात्री ११.१० वाजण्याच्या सुमारास कोसळली. या घटनेत नागेश रामचंद्र रेड्डी (३८) व रोहित रेड्डी (१०) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथील कोटक महिंद्रा बँकेजवळील दुभाजकाला बेस्ट बस धडकली. या घटनेत चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

रस्ते वाहतूक विस्कळीत

मुंबई शहर आणि उपनगरात रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, हिंदू कॉलनी, हिंदमाता, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा येथे तर पूर्व उपनगरात टागोरनगर विक्रोळी, सकीनाका, मुलुंड, भांडुप, विद्याविहार आणि पश्चिम उपनगरातून दहिसर, चेक नाका, अंधेरी, वांद्रे पश्चिम, विले पार्ले, मालाड या भागांतून पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या. संबंधित ठिकाणी कार्यवाही करून पाण्याचा निचरा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

५३ ठिकाणी झाडे, ६ ठिकाणी घरे कोसळली

जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई शहरात १७, पूर्व उपनगरात ७, तर पश्चिम उपनगरात २७ अशा ५३ ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, तर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी २ ठिकाणी घर वा घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये विक्रोळीत स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी