मुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी भाजप नेते अमित शहा यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय सीबीआयने स्वीकारला आहे. त्या विरोधात आव्हान देण्यात येणार नाही अशी माहिती सीबीआयने बुधवारी हायकोर्टात दिली.
गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी गुजरात मधील आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी जी वंझारा, एम एन दिनेश आणि भाजप नेते अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र यातील काही अधिकाऱ्यांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने आव्हान दिले असून मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले की, तपास यंत्रणा निकालाविरुद्ध कोणतेही अपील दाखल करणार नाही.
साक्षीदारांची यादी सादर करा!
अपीलकर्त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेत खटला सदोष असल्याचा दावा केला. काही साक्षीदारांच्या साक्षी ट्रायल कोर्टाने अचूकपणे नोंदवल्या नाहीत, असा दावा केला. याची खंडपीठाने दखल घेतली. ज्या साक्षीदारांचे जबाब त्यांच्या दाव्यानुसार अचूकपणे नोंदवले गेले नाहीत त्यांची यादी सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी १५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.