मुंबई

मीरारोडमध्ये रामभक्तांच्या मिरवणुकीवर दगडफेक; ४ जण गंभीर, २० किरकोळ जखमी

नयानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवित शांतता निर्माण केली.

Swapnil S

भाईंदर : रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली. यावेळी झालेल्या हाणामारीत ४ तरुण गंभीर जखमी, तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

अयोध्येत सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या पार्श्वभूमीवर मीरारोड आणि भाईंदर शहरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक मिरवणूक मीरारोडच्या हैदरी चौकातून जात असताना जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केली. यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून, जवळपास २० जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे, तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५० ते ६० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

नयानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवित शांतता निर्माण केली. ज्यांना मारहाण झाली, त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेत दंगल करणाऱ्या अनोळखी ५० ते ६० लोकांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहाय्यक पोलीस आयुक्त महेश तरडे, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे हे तणावाला शांत करण्यासाठी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक