मुंबई : विवाहित प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी अंबादास रामदास मोरे या ३५ वर्षांच्या रिक्षाचालक प्रियकराविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चारित्र्यावरून होणाऱ्या छळाला कंटाळून अश्विनीने तीन दिवसांपूर्वी घाटकोपर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्विनीचे बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या अतुलसोबत लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. चार वर्षांनंतर अश्विनीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या अंबादास मोरेशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. हा प्रकार समजताच पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले होते. सतत होणाऱ्या वादानंतर त्याने अश्विनीला तिच्या जळगाव येथील माहेरी सोडले होते. एक वर्ष माहेरी राहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिच्या सासरच्या मंडळींनी तिची समजूत काढली आणि तिला पुन्हा घरी आणले होते. मात्र तिची समजूत काढूनही ती अंबादासच्या संपर्कात होती. त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा वादविवाद सुरू झाले होते. या वादानंतर ती अंबादाससोबत राहू लागली होती.
अंबादास हादेखील विवाहित होता. मात्र काही महिन्यानंतर तो अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. याच कारणारून तो तिच्याशी भांडण करून तिला मारहण करत होता. तिचा अंबादासकडून मानसिक व शारीरिक छळ सुरु होता. सोमवारी २५ मार्चला रात्री दहा वाजता अश्विनीने तिच्या घाटकोपर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांना देण्यात आला. याप्रकरणी अश्विनीच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी अंबादास हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा माननिक व शारीरिक शोषण करत होता. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करून अंबादासविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अंबादास मोरे याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.