मुंबई

Tiger Shroff Firing: हल्ल्यात वापरलेली दुचाकी संशयाच्या भोवऱ्यात; मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद नाही

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी कथितरीत्या वापरलेली मोटारसायकल आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. २०२२ पासून या दुचाकीची चार वेळा खरेदी-विक्री झाली; मात्र मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद एकदाही करण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई :

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी कथितरीत्या वापरलेली मोटारसायकल आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. २०२२ पासून या दुचाकीची चार वेळा खरेदी-विक्री झाली; मात्र मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद एकदाही करण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पिवळ्या रंगाची पल्सर २२० सीसी ही मोटारसायकल आरोपींपैकी एक असलेल्या हृतिक रोशन ऊर्फ कुमार (वय २२) याने ११ सप्टेंबर रोजी सुमारे २६ हजार रुपयांना खरेदी केली. हा कट तडीस नेण्यासाठीच ही दुचाकी घेतल्याचा संशय आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नोंदींच्या आधारे पोलिसांनी दुचाकीच्या नोंदणीकृत मालकाचा शोध घेतला. त्याने अनेक वर्षांपूर्वीच ही गाडी विकली होती. त्यानंतर ही मोटारसायकल अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिल परिसरात राहणाऱ्या ख्वाजा शेख या आयटी क्षेत्रातील व्यावसायिकाकडे आली. शेखकडून आरोपी हृतिकने ती २५ हजार रुपयांना खरेदी केली. मात्र, मालकी हस्तांतरणाची कोणतीही अधिकृत नोंद केली नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी आतापर्यंत या मोटारसायकलच्या तीन माजी मालकांचे जबाब नोंदवले असून, त्यांना या प्रकरणात साक्षीदार म्हणून सहभागी करून घेतले आहे. सोमवारी पोलीस घरी पोहोचल्यानंतरच शेख यांच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळाली.

फेब्रुवारी २०२६ मध्ये चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारातही अशाच प्रकारची कार्यपद्धती समोर आली होती. या प्रकरणात एका संशयित सूत्रधाराने पाठवलेल्या पैशांतून पुण्यात सेकंडहँड स्कूटर खरेदी करण्यात आली, ती मुंबईत आणण्यात आली आणि नंतर विलेपार्ले येथे सोडून देण्यात आल्याचा आरोप आहे.

या तिन्ही घटनांमुळे पोलिसांच्या तपासात एका समान कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यामध्ये हल्ल्यासाठी वाहने खरेदी करणे किंवा मिळवणे, अनेक मध्यस्थांचा वापर करणे आणि हल्ल्यानंतर पळून जाण्यासाठी मार्गांचे काळजीपूर्वक नियोजन करणे, अशा बाबींचा समावेश आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असलेल्या हल्ल्यांमध्ये ही पद्धत दिसून आली आहे.

सध्या बेवारस अवस्थेत आढळलेली पल्सर दुचाकी आणि तिच्या मालकी हस्तांतरणाची नोंद नसलेली साखळी, जुहू येथील हल्ल्याच्या कटाचा उलगडा करण्यासाठी तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

आंदोलनांमुळे फुटीचा धोका - सरसंघचालक; विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा