‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला 
मुंबई

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मीरा-भाईंदरमधील कथित बोगस रिक्षा परमिट आणि बॅच घोटाळ्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या आरोपांतील हवाच काढून घेतली आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदरमधील कथित बोगस रिक्षा परमिट आणि बॅच घोटाळ्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या आरोपांतील हवाच काढून घेतली आहे. ‘परिवहन खात्यावर चिखलफेक करण्यापूर्वी किमान प्रशासकीय प्रक्रियेचा अभ्यास तरी करायचा होता, अशा बोचऱ्या आणि उपरोधिक शब्दांत मंत्री सरनाईक यांनी आ. मेहता यांना टोला लगावला आहे. महसूल, महापालिका, गृह आदी विभागातून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे परिवहन परवाने दिले गेले असून जर गृह आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही चुकीचे घडले असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन विभागाने १३ एप्रिल २०२६ रोजी मीरा-भाईंदरच्या तहसीलदारांना पत्र पाठवून पडताळणी सुरू केली होती. परिवहन मंत्र्यांनी या २८ बोगस परमीटधारकांवर कडक कारवाई करण्याचे आणि त्यांचे परमीट तातडीने निलंबित करण्याचे निर्देश देऊन, तो प्रस्ताव मंजुरीसाठी मागील महिन्यातच सचिवांकडे रवाना केला आहे. तर मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने तपास करून २७ जणांवर गुन्हा दाखल केला.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, आरटीओ किंवा परिवहन खाते हे केवळ शपथपत्र आणि इतर विभागांचे दाखले तपासून बॅच किंवा परमीट देण्यापुरते मर्यादित असते. त्यासाठी लागणारे वास्तव्याचे दाखले हे ‘महसूल विभागामार्फत’ तहसील कार्यालय देते. त्याची पडताळणी ‘पोलीस खात्या’कडून म्हणजेच गृह विभागाकडून केली जाते. म्हणजेच गृह आणि महसूल या दोन्ही विभागांकडून जी कागदपत्रे अधिकृत म्हणून येतात, त्यानुसारच परिवहन विभाग पुढील प्रक्रिया करतो.

आ. मेहतांच्या आरोपांची दखल घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना भेटणार आहे. आ. नरेंद्र मेहता यांची तुमच्या खात्यांविषयी तक्रार आहे, असे मी त्यांना सांगणार आहे. जर गृह आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे दिली असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी विनंती मी करणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन