मुंबई : राज्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची नि:संदिग्ध ग्वाही अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. त्यांनी दैनिक ‘नवशक्ति - द फ्री प्रेस जर्नल’च्या कार्यालयाला गुरुवारी सायंकाळी भेट देऊन पत्रकारांशी ‘संवाद’ साधला.
प्रारंभी ‘नवशक्ति - द फ्री प्रेस जर्नल’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी व अध्यक्ष अभिषेक कर्नानी यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मन:पूर्वक स्वागत केले व त्यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘नवशक्ति’चे संपादक प्रकाश सावंत व ‘द फ्री प्रेस जर्नल’चे कार्यकारी संपादक किरण तारे यांनी मुंढे यांची ‘नवशक्ति - द फ्री प्रेस जर्नल’च्या ‘यूट्यूब चॅनल’साठी स्वतंत्र मुलाखत घेतली. त्यानंतर ‘द फ्री प्रेस जर्नल’ व ‘नवशक्ति’च्या पत्रकारांशीही मुंढे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
तरुणांचा देश असलेल्या भारतातील जेन-झी पिढीचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मुंढे यांनी दिली. आपण बाजारात घेत असलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा योग्य आहे की नाही याविषयीची ग्राहक जागरूकता, औषध क्षेत्रातील सुधारणा आणि महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचा रोडमॅप यावर त्यांनी आपली परखड भूमिका रोखठोक मांडली. मी जननायक नाही, ‘सेलिब्रिटी’ नाही, तर कर्तव्यदक्ष व जबाबदार अधिकारी असल्याचे त्यांनी विनम्रपणे नमूद केले. त्यांच्यासोबतचा हा सवाल-जबाब -
प्रश्न : ‘नवशक्ति- द फ्री प्रेस जर्नल’च्या कार्यालयात आपले मनःपूर्वक स्वागत. सध्या सणासुदीचे आणि दिवाळीचे दिवस आहेत. या काळात अन्नसुरक्षेबरोबरच नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी तुमच्या विभागाने काय विशेष पावले उचलली आहेत?
तुकाराम मुंढे : सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा विभाग प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित असल्याने आम्ही प्रशासन लोकाभिमुख करून कारवाईत पारदर्शकता आणली. त्यामुळे आमचा विभाग जनतेशी थेट जोडला गेला आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी आम्ही महाराष्ट्रात सणासुदीच्या काळासाठी एक स्थायी अनुपालन आदेश काढला. पूर्वी दरवर्षी प्रत्येक सणासाठी तात्पुरते आदेश निघायचे; पण यावर्षी मी पुढाकार घेऊन हा आदेश वर्षभरासाठी आणि संपूर्ण सणासुदीच्या काळासाठी लागू केला. प्रत्येक नागरिकाच्या ताटात असलेले अन्न सुरक्षित आणि दर्जात्मक असावे. सणासुदीच्या काळात दूध, पनीर, मसाले, मिठाई, फरसाण यांची मागणी आणि पुरवठा प्रचंड वाढतो, ज्यामुळे निकृष्ट व असुरक्षित अन्न विकले जाण्याची शक्यता वाढते. म्हणून आम्ही तपासण्या आणि दक्षता मोहीम तीव्र केली आहे. १ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर या काळात ९,००० पेक्षा जास्त तपासण्या झाल्या, ९५७ पेक्षा जास्त परवाने निलंबित झाले आणि २५ हून अधिक परवाने रद्द करण्यात आले. फक्त १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या १५ दिवसांत ३,५०० तपासण्या करून १,८०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त (सुमारे ४३ कोटी रुपयांचे) असुरक्षित व निकृष्ट अन्न जप्त करण्यात आले. तसेच ३५० पेक्षा जास्त परवाने निलंबित झाले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अलिकडच्या अहवालानुसार देशात १० कोटी लोकसंख्या अन्नभेसळीने आजारी पडते. विशेष म्हणजे ७३ टक्के मृत्यू हे रासायनिक भेसळीने होतात. याबाबत नागरिकांनी सजग राहावे, अन्न निर्मिती व्यावसायिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये. मुख्य म्हणजे अन्न दर्जेदार असेल, तर देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील व तरुणाईच्या ऊर्जेचा देशाच्या विकासासाठी योग्य हातभार लागेल.
प्रश्न : नागरिकांच्या अन्न सुरक्षेसाठी आपण काय करता?
तुकाराम मुंढे : कारवाई करणे किंवा दंड वसूल करणे हे आमचे ध्येय अजिबात नाही. आमचा मूळ उद्देश हा आहे की, निकृष्ट, असुरक्षित किंवा चुकीचे लेबल लावलेले निकृष्ट अन्न लोकांच्या ताटात आणि पोटात जाऊ नये. मग ते तान्हे बाळ असो, लहान मूल असो की ज्येष्ठ नागरिक.
विशेषतः मिठाईत वापरल्या जाणाऱ्या रंगांबाबत नागरिकांना फारशी माहिती नसते. तयार अन्नात किंवा भारतीय मिठाईमध्ये कृत्रिम रंग १०० ppm पेक्षा जास्त वापरण्यास नियमानुसार मनाई आहे. आमच्या कडक कारवाईमुळेच बाजारातून जिल्ह्या-जिल्ह्यांतील चायनीज पदार्थांमधील आणि जिलेबीमधील रंग गायब झाला असून, अगदी 'बुढ्ढी के बाल' (कॉटन कँडी) सुद्धा आता रंगहीन आणि पांढरे विकले जात आहेत. त्याचप्रमाणे मुदत संपलेली उत्पादने पुन्हा नवीन ब्रँडिंग करून, कमी किमतीत अन्नसाखळीत आणणारी एक मोठी टोळी आम्ही नुकतीच उघडकीस आणली. त्यामुळे माझी नागरिकांना विनंती आहे की, केवळ स्वस्त आहे किंवा मोठा ब्रँड आहे म्हणून उघडे अथवा संशयास्पद सामान खरेदी करू नका. उत्पादनाची तारीख आणि त्याची मुदत कधी संपते हे पाहूनच अन्नपदार्थ खरेदी करा.
प्रश्न : एफडीएच्या तक्रार निवारण प्रणालीबद्दल खूप चर्चा आहे. सामान्य नागरिक या व्यवस्थेशी कसा जोडला जाऊ शकतो?
तुकाराम मुंढे : आम्ही १५ जुलै रोजी एक अत्यंत पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही 'तक्रार पोर्टल' सुरू केले आहे. नागरिक कोणत्याही कार्यालयात न जाता थेट त्यांच्या मोबाईलवरून तक्रार नोंदवू शकतात. विशेष म्हणजे, ज्यांना टाइप करता येत नाही त्यांच्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये 'व्हॉइस नोट'ची सुविधा आहे. तुम्ही फक्त बोला, ते टाइप होईल. तक्रारीचा फोटो, व्हिडिओ आणि ठिकाण टाकून सबमिट केले की तुम्हाला ट्रॅकिंग नंबर मिळतो.
ही यंत्रणा पूर्णपणे कालबद्ध आहे. एआयद्वारे तक्रार ४८ तासांच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडे जाते. त्याने ती ४८ तासांत वाचली नाही किंवा १४ दिवसांच्या आत त्यावर कारवाई केली नाही, तर ती आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हस्तांतरित होते आणि कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला सिस्टीमद्वारेच नोटीस बजावली जाते. १५ जुलैपासून आतापर्यंत या पोर्टलवर १७,००० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असून ७५ टक्क्यांहून अधिक तक्रारींचे वेळेत निवारण करण्यात आले आहे. याशिवाय, पुढच्या ६ ते ८ महिन्यांत आम्ही एक 'एंड-टू-एंड' महापोर्टल आणत आहोत. त्यात डेटा ॲनालिटिक्स, एआय आणि मशीन लर्निंगचा वापर करून 'फूड इंटेलिजन्स युनिट' आणि 'ड्रग इंटेलिजन्स युनिट' उभारले जाईल, जिथे नागरिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना थेट रेटिंग देऊ शकतील.
संपूर्ण विभागासाठी एकात्मिक पोर्टल विकसित करण्याचा आमचा आराखडा तयार आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांत ते कार्यान्वित करता येईल. प्रत्येक विक्रेत्याची नोंदणी या पोर्टलवर असेल. नागरिकांना रेस्टॉरंटना रेटिंग देता येईल. एआय आणि डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने अन्नविषयक माहितीचे विश्लेषण करणारे स्वतंत्र केंद्रही उभारले जाईल. देशातील अशा प्रकारचे हे पहिले केंद्र असेल.
प्रश्न : अवघ्या ५-६ महिन्यांत संपूर्ण विभागात आमूलाग्र बदल तुम्ही कसा घडवून आणला? आपली कार्यपद्धती काय होती?
तुकाराम मुंढे : मी रूजू झाल्यावर विभागासाठी एक व्हिजन, मिशन आणि रणनीती आखली. आमचे मिशन आहे - 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र'. हे साध्य करण्यासाठी आम्ही 'E3 रणनीती' राबवली :
सक्षमीकरण : प्रामाणिक अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे, प्रामाणिक अधिकाऱ्यांना कामाचे पूर्ण संरक्षण देणे आणि प्रसिद्धीपत्रके व फोटोंद्वारे सर्व कारवाई 'पब्लिक डोमेन'मध्ये आणून नागरिकांना सशक्त करणे.
सुलभीकरण : तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना तक्रार पोर्टल देणे आणि अन्न घटकांनुसार स्पष्ट 'अनुपालन आदेश' काढणे.
कडक अंमलबजावणी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. या रणनीतीमुळे ५ महिन्यांत आम्ही २५,००० पेक्षा जास्त अन्न तपासण्या केल्या (पूर्वी वर्षभरात २०,००० ही गाठता येत नव्हते). एका वर्षात जिथे जास्तीत जास्त १४२ निलंबने व्हायची, तिथे आम्ही ५ महिन्यांत १,२०० हून अधिक आस्थापना निलंबित केल्या आणि १५,००० पेक्षा जास्त सुधारणा नोटिसा बजावल्या.
प्रश्न : अन्न सुरक्षेसोबतच औषध प्रशासनाच्या आघाडीवर काय कारवाई सुरू आहे?
तुकाराम मुंढे : औषध क्षेत्रातही आम्ही अभूतपूर्व तपासण्या केल्या आहेत. गेल्या ५ महिन्यांत २,६०० पेक्षा जास्त कारवाईच्या घटना घडल्या. फार्मसीचे २,००० पेक्षा जास्त परवाने निलंबित झाले, तर उत्पादन क्षेत्रातील ५०० हून अधिक परवाने निलंबित करण्यात आले. सौंदर्यप्रसाधने, रक्तपेढ्या, खासगी चाचणी प्रयोगशाळा आणि आयुर्वेद औषध निर्मात्यांवर आम्ही कठोर पावले उचलली. महाराष्ट्रात ४०० पेक्षा जास्त आयुर्वेदिक उत्पादकांपैकी १५० हून अधिक जणांकडे योग्य उत्पादन प्रणालीचा ('GMP') परवाना नव्हता, त्यांचे परवाने आम्ही तत्काळ निलंबित किंवा रद्द केले. माझ्यासाठी नियम पाळणारा परवानाधारक महत्त्वाचा आहे; तिथे लहान-मोठा किंवा ब्रँडेड-नॉनब्रँडेड असा कोणताही भेदभाव केला जात नाही.
प्रश्न : २१ वर्षांच्या सेवाकाळात २५ बदल्यांचा अनुभव आणि ही एफडीएची नियुक्ती... या प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता?
तुकाराम मुंढे : मी माझ्या प्रत्येक नियुक्तीचा आणि जबाबदारीचा मनापासून आनंद घेतला आहे. एफडीएमधील ही नियुक्ती अधिक विशेष आणि आव्हानात्मक आहे. आम्ही हे प्रशासन अधिक लोकाभिमुख करून त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातील अधिकारीच नव्हे, तर राज्यातील सर्व नागरिक हेच आता आमचे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत असे आम्ही मानतो. अन्नसुरक्षेचा प्रश्न जर आपण यशस्वीरीत्या हाताळला, तर लोकांचे आरोग्य सुधारेल, त्यांची उत्पादकता वाढेल आणि आरोग्यावर स्वतःच्या खिशातून होणारा खर्च कमी होईल. दुसरीकडे कृषी अर्थव्यवस्था बळकट होईल. लोकांचे जीवन सुरक्षित आणि दर्जेदार करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे, म्हणूनच या पदावर काम करताना मला मनापासून समाधान वाटते. सोपा मार्ग निवडण्यापेक्षा नेहमी योग्य मार्ग निवडा, हाच माझा सर्वांना संदेश असेल.
दुष्काळ निवारणासाठी काय करायला हवे?
प्रश्न: मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तुमच्या अनुभवावरून काय उपाय सांगाल?
तुकाराम मुंढे: मी जेव्हा सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो, तेव्हा आम्ही दुष्काळाच्या संकटाला संधीत बदलले होते. टँकरवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आम्ही मूळ कारणावर काम केले. त्या वर्षी आम्ही सोलापूर जिल्ह्यातील टँकरची मागणी ७०० वरून थेट ३० वर आणली आणि नंतर ती शून्यावर पोहोचवली.
दुष्काळमुक्तीसाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या
कंपार्टमेंट बंडिंग (शेतात कप्पे बांधणी): प्रत्येक गावातील, प्रत्येक भूखंडातील आणि शेतातील पाणी तिथेच अडवून जमिनीत जिरवले पाहिजे. यामुळे भूजलपातळी प्रचंड वाढते.
योग्य पीकपद्धती: जमिनीच्या आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मातीला अनुकूल पिकांची निवड केली पाहिजे.
यासाठी मी उद्योगजगत आणि कॉर्पोरेट क्षेत्राला आवाहन करतो की, त्यांनी त्यांचा CSR (Corporate Social Responsibility) निधी इतरत्र खर्च करण्याऐवजी गावोगावी जलसंधारणावर आणि ‘कंपार्टमेंट बंडिंग’वर केंद्रित करावा. ही सरकार आणि जनता यांची संयुक्त लोकचळवळ झाली, तर महाराष्ट्राला पुन्हा कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.
आजच्या तरुणाईला आहाराबद्दल काय सल्ला द्याल?
प्रश्न: आजची 'जेन-झी' पिढी तुमच्याकडे एका आयकॉन म्हणून पाहते. या तरुण पिढीला त्यांच्या जीवनशैलीबद्दल आणि आहाराबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल?
तुकाराम मुंढे: मी कोणताही स्टार नाही, जननायक नाही, मी कर्तव्यदक्ष 'लोकसेवक' आहे. मला संविधानाने आणि नियमाने जी जबाबदारी सोपवली आहे, ती लोकांच्या भल्यासाठी पार पाडणे हेच माझे ध्येय आहे. आजची नवीन पिढी जेंडर इक्वॅलिटी आणि समानतेवर खूप भर देते, ही कौतुकास्पद बाब आहे. पण त्यांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहिले पाहिजे. देशातील तरुणाईने योग्य विचार व कृतीच्या माध्यमातून नैतिकतेने मार्गक्रमणा केल्यास आपल्या देशाची प्रगती निश्चित होईल. HFSS म्हणजेच High in Fat, Salt, and Sugar असलेले अन्न, अति-तळलेले पदार्थ आणि तथाकथित 'एनर्जी ड्रिंक्स' पूर्णपणे टाळले पाहिजेत. आहारात मोड आलेली धान्ये, संपूर्ण अन्न (Whole Grains), ताजी फळे, जीवनसत्त्वे आणि आवश्यक प्रोटीन्सचा समावेश करा. चवीपेक्षा अन्नाच्या दर्जाला आणि सुरक्षेला प्राधान्य द्या. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पुरेशी झोप, योग्य व्यायाम आणि समतोल आहार या तिन्हींचा समतोल साधा. बौद्धिक वाढीसाठी चांगले विचार, नैतिक आचरण आणि चांगल्या पुस्तकांचे वाचन अत्यंत गरजेचे आहे.