मुंबई : नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी दडपशाहीच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवार, २६ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
शिवाजी पार्क ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांना तसेच सर्व राजकीय पक्षांना आपापले पक्षीय झेंडे बाजूला ठेवून केवळ तिरंगा हातात घेऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ठाकरे बंधूंनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोर्चाची घोषणा केली. या मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सरकारला सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी केली जाणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतर हा प्रश्न केवळ केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिला नसून तो आता पंतप्रधानांच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे, असा दावा यावेळी त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विषय केवळ नीटपुरता राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांचा राग आता उफाळून आला आहे, असे नमूद करून उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायमूर्तींना विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सध्या न्यायालयाची परिस्थितीसुद्धा धृतराष्ट्रासारखी झाली असून द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखे झालेले आहे.