मुंबई

'गेट वे'वर सायकलप्रेमींची अवतार सैनींना अनोखी श्रद्धांजली; सायकल चालवताना झाले होते अपघाती निधन

Swapnil S

मुंबई : ‘इंटेल’ इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचे सायकल चालवताना झालेल्या भीषण अपघातात गेल्या आठवड्यात निधन झाले. मुंबईतील सायकलप्रेमी लोकांनी रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे एकत्र येऊन अवतार सैनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

२८ फेब्रुवारी रोजी अवतार सैनी हे नेरूळच्या पामबीच रोडवर सायकल चालवत होते. तेव्हा भरधाव कारने त्यांच्या सायकलला धडक दिली. या अपघातात त्यांचे निधन झाले.

त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला जुहू येथून सायकलप्रेमींचा मोठा गट ५.४५ वाजता निघाला. तो गेट वे ऑफ इंडियाला सकाळी ७ वाजता पोहोचला. मुंबई सायकलिंगप्रेमींच्या सोशल मीडिया पेजवरून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. या सायकलप्रेमी गटाचे २९ हजार सदस्य आहेत.

सैनी हे इंटेलचे सेमीकंडक्टर चीपचे भारतातील प्रमुख होते. इंटेलचे पेंटियम प्रोसेसर बनवणाऱ्या टीमचे ते प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या आठवणी जागवताना त्यांच्या चाहत्यांनी सांगितले की, सैनी यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी सायकल चालवायला सुरुवात केली. लवकरच ते सायकल चालवण्यात मास्टर बनले. २०२२ मध्ये त्यांनी १० हजार किमी अंतर कापले.

आयुष्याच्या इतक्या उशिराने त्यांनी सायकल चालवणे सुरू केले तरीही त्यांनी आश्चर्यकारक पराक्रम केला.

सॉफ्टवेअर प्रोफेशनल व ‘सायकल’ सल्लागार अजय लुलिया यांनी सांगितले की, सैनी यांचा झालेला अपघात भयानक होता. अवतार हा माझा चांगला मित्र होता. एका सायकलच्या कार्यक्रमात मी त्याला भेटलो होतो.

गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमाला अनेक जण सोशल मीडियावरून हजर होते. दुचाकी चालवणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. रस्त्यावर अवतार सैनी यांचा मृत्यू व्हावा, ही बाब धक्कादायक आहे. बेजबाबदार गाडी चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस