मुंबई : फोर्ट परिसरातील शासकीय इमारत असलेल्या ‘ओल्ड कस्टम हाऊस’मध्ये कार्यरत असलेल्या ‘उर्दू साहित्य अकादमी’ला भाड्याच्या जागेत स्थलांतर होण्याचे आदेश सांस्कृतिक विभागाने दिले आहेत. या निर्णयास तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांना केली असून सरकार उर्दू साहित्य अकादमीला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपचे अॅड. आशिष शेलार हे मंत्री असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘उर्दू साहित्य अकादमी’ला भाड्याच्या जागेत स्थलांतर होण्याचा आदेश दिला आहे. उर्दू साहित्य अकादमीला मागच्या वर्षी २ कोटी निधी तरतूद असतानाही अवघा १६ लाख निधी प्राप्त झालेला आहे. मंत्रालय परिसरात जागा भाड्याने घेण्यासाठी अकादमीला प्रतिमाह २० लाख रुपयांची (निधीच्या सहा पट) आवश्यकता असणार आहे.
यंदा उर्दू अकादमी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. अकादमीची या पद्धतीने शासकीय जागेतून हकालपट्टी खेदजनक आहे. अकादमीची ७ पैकी ४ कर्मचारी पदे रिक्त असून सर्व सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. ‘ओल्ड कस्टम हाऊस’मध्ये सिंधी, हिंदी, गुजराती, संस्कृत, तेलगु, बंगाली, गोर बंजारा आदी अकादमींना सन्मानाने दालन वाटप करण्यात येत असताना ‘उर्दू अकादमी’ला सांस्कृतिक कार्य विभागाकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे.
मराठी आणि उर्दू साहित्यिकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने १९७५ मध्ये ‘उर्दू अकादमी’ची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली. शंकरराव चव्हाण हे उर्दू अकादमीचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. अकादमीचे कार्यालय १९९६ पासून फोर्ट परिसरातील ‘ओल्ड कस्टम हाऊस’मधील सांस्कृतिक कार्य विभागाच्या जागेमध्ये कार्यरत आहे.
दरवर्षी ५ कोटींचा निधी द्या - आ. रईस शेख
भाड्याच्या जागेत स्थलांतर होण्याच्या सांस्कृतिक विभागाच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी. मंत्रालय परिसरात शासकीय जागा उपलब्ध झाल्यानंतर उर्दू अकादमीचे कार्यालय स्थलांतरित करावे, अकादमीची रिक्त कर्मचारी पदे व सदस्यांच्या नियुक्त्या तातडीने कराव्यात तसेच अकादमीचा निधी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये करावा, आदी मागण्या आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केल्या आहेत.