मुंबई : लोकसंख्या पुरस्काराच्या निमित्ताने भारतीय मुलींच्या आणि महिलांच्या प्रश्नाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली, याबद्दल यूएनएफपीएचे आभार मानते. सामाजिक प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनेच मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हा पुरस्कार स्वीकारला आहे. असे सांगतानाच बीड जिल्ह्यात आज एकही बालविवाह होत नाही, असे ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी दगडांचा मारा सहन केला, म्हणून मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर उभी राहून हा पुरस्कार स्वीकारू शकले, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘लोकसंख्या पुरस्कार’ न्यूयॉर्क येथे ११ जुलै या लोकसंख्या दिनी प्रदान करण्यात आला. त्याबद्दल गल्स स्काऊट आणि दलित महिला विकास मंडळ या संस्थांनी त्यांचा सत्कार समारंभ सोमवारी मुंबई येथे आयोजित केला होता. विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांसह यूएनएफपीएच्या भारतातील प्रतिनिधी अँड्रिया वोन्जर, धनश्री ब्रह्मे, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश शालिनी जोशी, सार्वजनिक आरोग्य या विषयातील स्वतंत्र अभ्यासक डॉ. अमर जेसानी, पॉप्युलेशन फर्स्ट संस्थेच्या संस्थापक डॉ. ए. एल. शारदा, शासकीय अधिकारी श्याम वर्धने, डॉ. आसाराम खाडे ही मंडळी या सत्काराला आवर्जून उपस्थित होती. स्त्रिया आणि मुलींसाठी हे जग सुरक्षित करण्यासाठी ॲड. वर्षा देशपांडे यांनी जे कार्य केले त्याचे कौतुक प्रत्येक वक्त्याने आपल्या मनोगतात व्यक्त केले.
गल्स स्काऊट संस्थेच्या रिझवान परवेझ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आर्या जाधव आणि स्वरा किर्पेकर यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सत्कारमूर्ती ॲड. वर्षा देशपांडे यांच्यावरील माहितीपट दाखवण्यात आला. वर्षा देशपांडे यांनी लिंगनिवड करून होणाऱ्या स्त्रिलिंगी गर्भपातांविरोधात स्टिंग ऑपरेशन ते प्रबोधन असे विविध पातळ्यांवरचे अभियान राबविले तसेच किशोरवयीन मुलींसाठी कौशल्य विकासाचा उपक्रमही राबवला. यात किशोरवयीन मुलींना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रियंका आणि सोनाली बडे यांनी या प्रशिक्षणामुळे आपल्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाले, याविषयीचे आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रलोभन म्हणून काम करणाऱ्या गरोदर माता तस्लिमा भिलारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आजही स्त्रियांचे प्रश्न संपलेले नाहीत, लिंगनिवड चाचणी थांबलेली नाही, म्हणूनच एकत्र येत पुन्हा संघर्ष करण्याची गरज आहे, असे वर्षा देशपांडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले. त्याचा उल्लेख करत स्त्रीहक्कांच्या लढ्यात आपण सर्व एकत्र आहोत, असा विश्वास वेगवेगळ्या वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.