वसई : ‘आमची वसई’ सामाजिक संस्थेतर्फे वसई किल्ल्यात २८८ वा ‘वसई दुर्ग दीपोत्सव’ शनिवारी (७ नोव्हेंबर) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ऐतिहासिक वसई किल्ला मशाली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. यावेळी मशाल यात्रा, रांगोळी स्पर्धा आणि विविध मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
नरवीर चिमाजी आप्पा स्मारक परिसरात आयोजित या दीपोत्सवात श्रीनागेश महातीर्थ, नागेश्वर मंदिर, वज्रेश्वरी देवी मंदिर, दोन्ही हनुमान मंदिरे, त्रिविक्रम मंदिर तसेच चिमाजी आप्पा स्मारक परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. आकर्षक रांगोळ्या आणि आकाशकंदिलांमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. श्रीनागेश तीर्थापासून नरवीर चिमाजी आप्पा स्मारकापर्यंत मशाल यात्राही काढण्यात आली. धर्मसभा-विद्वत्संघ आणि ‘आमची वसई’च्या सदस्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे, स्थानिक औषधी वनस्पतींची रोपे आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वसई रत्न, वसई विभूषण, वसई भूषण, दोन वसई श्री आणि वसई हिरकणी असे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. मीनाज नदाफ, प्रा. चंद्रकांत आरोळे, अॅड. देवांग राऊत आणि हेमलता वर्तक यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण किल्ला परिसर दुमदुमला
कार्यक्रमात वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिवाळी साधेपणाने, कमी खर्चात आणि प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच अनावश्यक खर्च टाळून त्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा व्यक्त केली. वसईच्या मुक्तीसाठी हिंदवी स्वराज्याच्या २१ हजार सैनिकांनी बलिदान दिले. त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण जपण्यासाठी हा दीपोत्सव आयोजित केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मशालींचा प्रकाश, वाद्यांचा गजर आणि जय भवानी, जय शिवाजी, जय वज्राई, जय चिमाजीच्या घोषणांनी संपूर्ण किल्ला परिसर दुमदुमून गेला.
दिवाळी मेळाव्याचा उत्साह
आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलमध्ये दिवाळीनिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दीपमाळा, आकर्षक रांगोळ्या, आकाशकंदील आणि भव्य किल्ल्याच्या सजावटीमुळे शाळेला जत्रेचे स्वरूप आले होते. वसई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. खाद्यपदार्थांचे स्टॉल, बौद्धिक खेळ, मेहंदी आणि टॅटू यांसारख्या उपक्रमांसह विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि संगीताचे सादरीकरण केले. हनुमान चालीसा, सीताहरण आणि दिवाळीचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सौरभी पवार यांनी पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांना वेळ द्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच भारतीय संस्कृती आणि संस्कारांची ओळख करून देणारा हा मेळावा उत्साहात पार पडला.