मुंबई

Vasai–Virar : आयारामांना भाजपचे रेड कार्पेट, निष्ठावानांवर अन्याय; बविआच्या घटल्या ४० जागा; काँग्रेस व मनसेने उघडले खाते!!

वसई-विरार महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने (बविआ) पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असले, तरी मावळत्या महापालिकेतील त्यांचे संख्याबळ १०७ वरून थेट ६६ वर घसरले आहे, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. दुसरीकडे भाजपचे संख्याबळ एका नगरसेवकावरून थेट ४३ वर गेले असले, तरी उपलब्ध संधींच्या तुलनेत महायुतीला अपेक्षित यश गाठता आलेले नाही.

Swapnil S

अनिलराज रोकडे/वसई-विरार

वसई-विरार महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने (बविआ) पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असले, तरी मावळत्या महापालिकेतील त्यांचे संख्याबळ १०७ वरून थेट ६६ वर घसरले आहे, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. दुसरीकडे भाजपचे संख्याबळ एका नगरसेवकावरून थेट ४३ वर गेले असले, तरी उपलब्ध संधींच्या तुलनेत महायुतीला अपेक्षित यश गाठता आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभांपासून ते विविध राजकीय कुरघोड्यांपर्यंत सर्व शक्ती पणाला लावूनही भाजप-शिवसेना महायुतीला वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची पुनरावृत्ती या महापालिका निवडणुकीत साधता आली नाही. गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत महापालिकेत वाढलेला भ्रष्टाचार, बोकाळलेली अनधिकृत बांधकामे तसेच रस्ते व नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे जनता सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर नाराज असल्याचा स्पष्ट संदेश या निकालातून मिळतो.

सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार महापालिका क्षेत्रात कार्यरत असतानाही या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता न आल्याचे दिसून आले. विशेषतः भाजपच्या दोन्ही आमदारांमधील समन्वयाचा अभाव वारंवार समोर येत राहिल्याने त्याचा नकारात्मक परिणाम मतदारांवर झाल्याचे जाणवते. याउलट, माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभा पराभवाची निराशा झटकून, कोणतीही सत्ता नसताना एकहाती मिळवलेले यश राजकीयदृष्ट्या दैदीप्यमान ठरते.

बविआसोबत समझोता करत व्यवहारी राजकारण खेळणाऱ्या काँग्रेसने ४, तर मनसेने १ जागा जिंकत पालिकेत आपले खाते उघडले आहे. नवघर-माणिकपूर शहरातील भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते शेखर धुरी आणि यापूर्वी पालिकेत पक्षाचे एकमेव नगरसेवक असलेले किरण भोईर यांना उमेदवारी नाकारून पक्ष नेतृत्वाने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारल्याचे चित्र दिसून आले. परिणामी दोघांनीही बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. याचा थेट फायदा बहुजन विकास आघाडीने उचलला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेखर धुरी यांना बविआमध्ये प्रवेश देत प्रभाग क्रमांक २६-ड मधून उमेदवारी बहाल करण्यात आली.

विशेष म्हणजे, भाजपमध्ये तीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या शेखर धुरी यांची थेट लढत भाजपचे निष्ठावान पदाधिकारी व उमेदवार उत्तमकुमार नायर यांच्याशी झाली आणि त्यात धुरी विजयी ठरले. प्रचारादरम्यान धुरी यांनी भाजपच्या आमदारांवर व विद्यमान नेतृत्वावर जोरदार टीका करत पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचा फटका पक्षाला अनेक प्रभागांत बसल्याचे दिसून आले.

वर्षभरापासून पक्षात ये-जा करणाऱ्या तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारीचे ‘रेड कार्पेट’ अंथरले गेले; मात्र विधानसभा निवडणुकीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याची तीव्र भावना या निकालातून समोर आली आहे.

नेत्रदीपक विजय

बविआचे माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रोड्रिक्स, बविआचे संघटक सचिव व माजी सभापती अजिव पाटील, माजी सभापती प्रशांत राऊत व प्रफुल्ल साने, माजी नगरसेविका पुष्पा जाधव, कल्पेश मानकर, डॉ. शुभांगी पाटील, काँग्रेसच्या बीना फुर्ट्याडो, भाजपचे निलेश चौधरी व जयप्रकाश सिंह, उबाठा सेनेतून भाजपात आलेले पंकज देशमुख, तसेच भाजपचे शहराध्यक्ष महेश सरवणकर व प्रदीप पवार यांनी या निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवला.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती