ट्रेनचा मार्ग बदलल्याने वेलंकनी यात्रेकरूंना मनस्ताप; प्रवाशांचा वसई स्थानकात ठिय्या, रेल्वेकडून पर्यायी विशेष गाडीची व्यवस्था (Photo-X)
मुंबई

ट्रेनचा मार्ग बदलल्याने वेलंकनी यात्रेकरूंना मनस्ताप; प्रवाशांचा वसई स्थानकात ठिय्या, रेल्वेकडून पर्यायी विशेष गाडीची व्यवस्था

वसईहून कल्याण व पुणे मार्गे तामिळनाडूतील वेलंकनी येथे जाणाऱ्या हजारो यात्रेकरूंना गुरुवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Swapnil S

वसई : वसईहून कल्याण व पुणे मार्गे तामिळनाडूतील वेलंकनी येथे जाणाऱ्या हजारो यात्रेकरूंना गुरुवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अहमदाबाद जंक्शन-तिरुचिरापल्ली एक्स्प्रेसचा मार्ग कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बदलून ती सुरतपूर्वीच सोलापूरमार्गे वळविण्यात आल्याने दोन महिन्यांपूर्वी आरक्षण केलेल्या हजारो प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी वसई रोड रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत पर्यायी गाडीची मागणी केली. अखेर लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर रेल्वे प्रशासनाने यात्रेकरूंसाठी विशेष गाडीची व्यवस्था केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

देशातील ख्रिस्ती समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या तमिळनाडूतील वेलंकनी येथे मरिया मातेच्या नोव्हेनानिमित्त दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात. यामध्ये वसई परिसरातील ख्रिस्ती बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. सध्या मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असल्याने वसईतील सामान्य ख्रिस्ती नागरिक तसेच ख्रिस्ती कोळी बांधवांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच यात्रेसाठी रेल्वे आरक्षण केले होते.

या घटनेची माहिती समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, तसेच पालघरचे आजी-माजी खासदार आणि वसई-नालासोपारा मतदारसंघातील आजी-माजी आमदार यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून प्रवाशांच्या समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने मध्यरात्री यात्रेकरूंसाठी वसई रोड ते दौंडदरम्यान विशेष गाडीची व्यवस्था केली. रात्री सुमारे ३ वाजता ही विशेष गाडी वसई रोड स्थानकातून रवाना करण्यात आली.

तब्बल नऊ ते दहा तास ठिय्या आंदोलन

गुरुवारी दुपारी वसई रोड स्थानकातून सुटणारी अहमदाबाद जंक्शन-तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस पकडण्यासाठी उत्तन, भाईंदर, वसई, पाचूबंदर-कोळीवाडा, अर्नाळा आदी परिसरातील हजारो भाविक सकाळी ११ वाजल्यापासून स्थानकात येऊन थांबले होते. मात्र, लोणावळा परिसरात रेल्वे रुळांवर दरड कोसळल्यामुळे ही एक्स्प्रेस सुरतपूर्वीच सोलापूरमार्गे वळविण्यात आल्याची माहिती प्रवाशांना ऐनवेळी मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत पर्यायी व्यवस्थेची मागणी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड