मुंबई : वॉण्टेड असलेल्या एका ड्रग्ज तस्कराला सहा महिन्यानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. कमल नितीनकुमार राजपूत असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो आठवा आरोपी आहे. त्याच्या सात सहकार्यांकडून पोलिसांनी सुमारे साडेआठ कोटीचे ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत कमलसह त्याचा मोठा भाऊ कैलास नितीनकुमार राजपूत या दोघांना वॉण्टेड घोषित करण्यात आले होते. अखेर कमल राजपूतला पोलिसांनी अटक केली.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करी करणारी एक टोळी कार्यरत असून, या टोळीने मोठ्या प्रमाणात केटामाईनसह ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा साठा साठवणूक केला असून, त्याची लवकरच विक्री होणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर १६ मार्च रोजी खंडणीविरोधी पथकाने अंधेरीतील पारसी पंचायत रोड, साईनाथ सहकारी सोसायटीच्या गाळा क्रमांक ११० मधून विजय जगन्नाथ राणे, मोहम्मद आसिफ मोहम्मद इब्राहिम शेख या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर त्यांचे इतर सहकारी नितेश संजय यादव, विकासकुमार सनिकचंद गुप्ता, अभय वसंत जडये, बाळासाहेब बाजीराव काकडे, शितेश सुरेश पवार, अलीअसगर परवेजअली शिराजी या सहाजणांना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी ७ कोटी ८७ लाख १५ हजार रुपयांचा १५ किलो ७४३ ग्रॅम वजनाचा केटामाईन तसेच ५८ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ड्रग्जमिश्रीत प्रतिबंधित औषधे-गोळ्यांचा साठा जप्त केला आहे.