एका युद्धवीराचे अवयवदान; यकृताने गरजूला मिळाले जीवनदान, भारत-पाकिस्तान युद्धात बजावली होती सेवा 
मुंबई

एका युद्धवीराचे अवयवदान; यकृताने गरजूला मिळाले जीवनदान, भारत-पाकिस्तान युद्धात बजावली होती सेवा

भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धातील माजी सैनिक अशोक चोपडे (७५) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने अवयवदानाचा कौतुकास्पद निर्णय घेतला.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धातील माजी सैनिक अशोक चोपडे (७५) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने अवयवदानाचा कौतुकास्पद निर्णय घेतला. बांगलादेश मुक्ती युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात त्यांनी रिपोर्टिंग ऑफिसर म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अवयवदानामुळे इतर व्यक्तींना नवीन जीवन मिळणार असून या माध्यमातून ते या जगात जिवंत राहणार आहेत. झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२६ मधील मुंबईतील हे २५ वे मरणोत्तर अवयवदान ठरले आहे. राज्याच्या वितरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिवंगत सैनिकाचे यकृत गरजू रुग्णाला दान करण्यात आले.

अशोक चोपडे यांचे सुपुत्र पवन चोपडे यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता; परंतु, इतर कोणतीही मोठी आरोग्य समस्या नव्हती. मात्र; ९ मे रोजी उलट्या झाल्यानंतर त्यांना चक्कर आणि थकवा जाणवू लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु एमआरआय तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन ब्लीड) झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्या कवटीच्या आतील दाब (इंट्राक्रॅनिअल प्रेशर) वाढला होता. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. त्यानंतर इतर डॉक्टरांचा आणि न्यूरोसर्जनचा सल्ला घेतला असता त्यांनीही तेच सांगितले. अखेर १७ मे च्या संध्याकाळी अशोक चोपडे यांचे निधन झाले.

रुग्णालय प्रशासनाने चोपडे कुटुंबाला अवयवदानाचा सल्ला दिला होता. वेळ अत्यंत कमी असल्याने आम्ही कुटुंबात चर्चा केली आणि अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळेच आमचे वडील या पृथ्वीतलावरून गेल्यानंतरही इतरांच्या रूपात जिवंत राहणार आहेत.
पवन चोपडे, अशोक चोपडे यांचे पुत्र

चोपडे मूळचे ठाण्याचे

चोपडे कुटुंब मूळचे ठाण्याचे रहिवासी आहे. अशोक चोपडे यांनी देशभरात सेवा बजावली; परंतु १९७१ च्या युद्धादरम्यान ते लखनऊ येथे रिपोर्टिंग ऑफिसर म्हणून तैनात होते. या युद्धामुळे तत्कालीन पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता 'कुलपती पदक'; राज्यपालांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

GSB गणपतीचे १२ सप्टेंबरपासून दर्शन; मंडळाने उतरवला ७०३ कोटींचा विमा

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज! राज्य शासनाचा निर्णय; स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय