मुंबई

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

या निर्णयानंतर पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल सेवांची संख्या २११ वरून २२७ पर्यंत वाढणार आहे. मात्र, एकूण उपनगरीय फेऱ्यांची संख्या १,४१४ इतकीच कायम राहणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपनगरीय लोकलमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी १९ मार्चपासून १२ डब्यांच्या १६ उपनगरीय सेवांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा बदल गुढीपाडव्याच्या दिवशीच लागू होणार आहे.

या निर्णयानंतर पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल सेवांची संख्या २११ वरून २२७ पर्यंत वाढणार आहे. मात्र, एकूण उपनगरीय फेऱ्यांची संख्या १,४१४ इतकीच कायम राहणार आहे.

प्रवाशांची वहनक्षमता सुमारे २० टक्क्यांनी वाढणार

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या बदलामुळे प्रवाशांची वहनक्षमता सुमारे २० टक्क्यांनी वाढणार असून चर्चगेट-विरार-डहाणू रोड या अतिगर्दीच्या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गांमध्ये हा कॉरिडॉर सर्वाधिक व्यस्त मानला जातो. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

गर्दीच्या वेळेत ८ लोकल सेवा

१५ डब्यांमध्ये रूपांतरित होणाऱ्या १६ सेवांपैकी ८ सेवा पीक अवरमध्ये चालवण्यात येणार आहेत.

यामध्ये ४ सेवा सकाळच्या गर्दीच्या वेळेत तर ४ सेवा संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चालवण्यात येतील. त्यामुळे कार्यालयीन वेळेतील प्रचंड गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे पाऊल

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन गर्दी कमी करणे आणि प्रवाशांची सोय सुधारणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

पश्चिम रेल्वेकडून सध्या क्षमता वाढ आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यावर भर दिला जात असून, वाढत्या प्रवासी ताणाचा सामना करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.

मुंबईची लाइफलाइन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही शहराची लाइफलाइन मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या सेवांवर अवलंबून असतात. त्यामुळे अधिक १५ डब्यांच्या लोकल सुरू झाल्यास विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवास काहीसा सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल