मुंबई

'कवच' करणार लोकल प्रवाशांची सुरक्षा! मुंबईकरांच्या लाईफलाईनला लवकरच 'सेफ' बनवणार नवीन प्रणाली, जाणून घ्या खासियत

मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे लवकरच आपल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’ बसवणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे लवकरच आपल्या लोकल ट्रेन सेवांमध्ये स्वदेशी टक्कर विरोधी प्रणाली ‘कवच’ बसवणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

पश्चिम रेल्वे ही सर्वात व्यस्त उपनगरीय रेल्वे सेवा मानली जाते. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षाच्या अखेरीस ही प्रणाली पश्चिम रेल्वेमध्ये बसवण्यात येणार आहे. चर्चगेट-विरार-डहाणू मार्गावर चालणाऱ्या सर्व लोकल ट्रेनमध्ये 'कवच' प्रणाली बसवली जाणार आहे. या मार्गावर दररोज ११० EMUs (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) आणि १४०० हून अधिक लोकल ट्रेन सेवा कार्यरत आहेत, ज्यात दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एकूण, पश्चिम रेल्वे २,३५८ किमीहून अधिक मार्गांवर 'कवच' तैनात करण्याची योजना आखत आहे.

काय आहे हे कवच?

‘कवच’ ही मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केलेली एक अत्याधुनिक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे. ती सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉर आणि इतर काही प्रमुख मार्गांवर वापरली जात आहे. आता ती मुंबईच्या लोकल ट्रेन नेटवर्कमध्येही कार्यान्वित होणार आहे.

सध्याची AWS प्रणाली आणि तिच्या मर्यादा

सध्या पश्चिम रेल्वे ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टम (AWS) ही प्रणाली वापरत आहे. ही एक सुरक्षा प्रणाली आहे, जी मोटरमनला सिग्नल्सबद्दल इशारा करते, ब्रेकिंगमध्ये मदत करते आणि आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवते. म्हणजेच, ट्रेन चालवताना जर सिग्नल खराब झाला किंवा आपत्कालीन परिस्थिती आली, तर AWS प्रणाली मोटरमनला याबद्दल सूचित करते आणि आवश्यक असल्यास ट्रेन थांबवण्यासाठी मदत करते. मात्र, AWS ही अनेक वेळा सिग्नल पास्ड ॲट डेंजर (SPAD) आणि सिग्नल जंपिंग सारख्या गंभीर अपघातांना अटकाव करू शकत नाही. तिचा मॅन्युअल प्रतिसाद आणि मर्यादित ऑटोमेशन हे मोठे दोष मानले जातात.

'कवच' प्रणालीची वैशिष्ट्ये

पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की ‘कवच’ प्रणाली ही AWS पेक्षा अधिक प्रगत आणि सक्षम आहे. ही प्रणाली ट्रेन आणि सिग्नलिंग स्टेशन यांच्यात तात्काळ संवाद साधते, म्हणजेच कोणतीही अपात्कालीन घटना घडल्यास तिची माहिती लगेच सिग्नलिंग सिस्टमपर्यंत पोहोचते. त्यामुळे रेल्वे प्रशासन त्वरित पावले उचलू शकते आणि संभाव्य अपघात टाळता येतो. यामुळे मानवी चुका कमी होतात आणि संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमता वाढते.

जर लाल सिग्नलचे उल्लंघन झाले तर ‘कवच’मधील स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टम त्वरित सक्रिय होते आणि संभाव्य अपघात टाळण्याची शक्यता या प्रणालीमध्ये आहे. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही, इन-कॅब सिग्नलिंगमुळे चालकाला ट्रेनच्या कॅबमधूनच थेट सिग्नल आणि सूचना मिळतात, त्यामुळे निर्णय घेणे अधिक सोपे आणि वेगवान होते.

या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, समोरून किंवा मागून येणाऱ्या ट्रेनसोबत होणारी टक्कर टाळण्याची क्षमता. ही प्रणाली ट्रेनच्या वेगावर सतत लक्ष ठेवते आणि गरज पडल्यास स्वयंचलित ब्रेकिंग करून गाडी तात्काळ थांबवते.

तसेच, ‘कवच’ प्रणाली विद्यमान सिग्नल यंत्रणेसोबत सुसंगतपणे काम करू शकते, त्यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये फारसे बदल करण्याची आवश्यकता नाही. यामुळे ही प्रणाली लवकर आणि सहजपणे बसवणे शक्य होते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी क्रांतिकारी पाऊल

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, "या 'कवच' प्रणालीमुळे केवळ प्रवासी सुरक्षाच वाढणार नाही, तर संपूर्ण सेवेची कार्यक्षमता सुधारणार आहे." ते पुढे म्हणाले की, ''ही प्रणाली रेल्वेच्या हालचालींवर सातत्यानं नजर ठेवेल आणि आवश्यक वेग मर्यादा व सिग्नल निर्देशकांशी तुलना करून आवश्यक असल्यास स्वयंचलित ब्रेकिंग करेल.''

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास