मुंबई

पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणार -गिरीश महाजन

पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे आवाहन पर्यटन मंत्री महाजन यांनी केले.

Swapnil S

मुंबई : ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिव्हल २०२४ समारोपप्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे आवाहन पर्यटन मंत्री महाजन यांनी केले.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबई फेस्टिव्हल २०२४ मुंबई येथे २० ते २८ जानेवारी दरम्यान सुरू होता. या फेस्टिव्हलचा समारोप एमएमआरडीए मैदान क्र. ५ व ६ वांद्रे येथील महा मुंबई एक्सापो प्रदर्शनामध्ये 'कॉन्सर्ट फॉर चेंज' या कार्यक्रमाने झाला. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते.

या कार्यक्रमाला मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, संयुक्त राष्ट्र संघाचे स्थानिक सचिव शोभा शहा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगार निर्मितीही उपलब्ध होणार आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. जास्तीत-जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देणार असून राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्रकिनारा लाभला असून, ऐतिहासिक गड किल्ले, अजिंठा, वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, जैवविविधतेने समृद्ध वने, तेथील वन्य प्राणी, धार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई फेस्टिव्हल २०२४ हा आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्टपणे राबवला गेला. पुढील वर्षीही यापेक्षा अधिक चांगले कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत, हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक