मुंबई

गणेशोत्सवापूर्वी थकबाकी मिळणार का? प्रशासकीय मंजुरीनंतर पालिका कर्मचारी आशावादी

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2009 पासून देय असलेल्या भत्त्यांमध्ये तब्बल 100 टक्के वाढ करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2009 पासून देय असलेल्या भत्त्यांमध्ये तब्बल 100 टक्के वाढ करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. परंतु या पोटीची थकबाकी ही गणपतीच्या सणाच्या आधी मिळणार का, याकडे आता कर्मचाऱ्यांचे डोळे लागले आहेत.

पालिकेतील कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी सोमवारी आपल्या मागण्यांबाबत गगराणी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तातडीने गगराणी यांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मान्यता दिली.

पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती.

महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत वाटाघाटी करुन ही बाब देखील आता मार्गी लावण्यात आली आहे.

महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे.

भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भत्त्यांपोटीची ही थकबाकी गणेशोत्सवाच्या आधी मिळावी, असा कर्मचारी संघटनांचा आग्रह आहे. पालिका आयुक्त त्याला राजी झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. पण प्रशासनाने अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु आजवरचा शिरस्ता पाहता गणेशोत्सवाच्या आधीच ही थकबाकी मिळेल असा आशावाद कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी