मुंबई : वरळी येथील सेंच्युरी मिलच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभारल्या जाणार आहेत. यासाठी शापूरजी पालनची ग्रूप, रहेजा ग्रुपसह एकूण चार बड्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. या जागेचा विकास झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत १ हजार ३४८ कोटींचा महसूल जमा होणार आहे.
वरळी येथील सहा एकर भूभाग गरीब वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी घरांसाठी सेंच्युरी स्पिनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड यांना १ एप्रिल १९२७ पासून पुढील २८ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आला होता. या जागेवर मिलकडून बांधण्यात आलेल्या ४७६ खोल्या, १० दुकाने व चाळींसह हा मक्ता ३ ऑक्टोबर १९२८ ला केलेल्या करारान्वये देण्यात आला होता. हा करार ३१ मार्च १९५५ ला संपुष्टात आला. करार संपुष्टात आल्यानंतर या भूभागावर मुंबई महापालिकेची मालकी आहे. करार संपुष्टात आल्यानंतर भूभाग परत करण्याऐवजी तो आपल्या नावे अभिहस्तांतरित करण्यासाठी सेंचुरी मिल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तर महापालिकेनेही खटला लढवला. न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर सेंचुरी मिलची जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली.
मूळ कामगार, कर्मचाऱ्यांना घरे
सेंच्युरी मिलच्या जागेचा विकास खासगी विकासकामार्फत केला जाणार आहे. या ठिकाणी रहिवासी संकुल उभारले जाणार असून काही घरे सेंच्युरी मिलच्या मूळ कामगार, कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
चेहरामोहरा बदलणार
महापालिका आणि संबंधित सरकारी यंत्रणांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवी परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.