मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक भारतीयाला शक्य ती मदत पुरविण्याच्या” दृष्टीकोनातून प्रेरित होऊन, केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे आणि ओमानमधील भारतीय दूतावासाच्या तत्पर मदतीमुळे, ओमानमध्ये अडकलेल्या आणि गंभीर अडचणींना सामोरे जाणाऱ्या ३६ भारतीय कामगारांची सुटका होऊन ते सुरक्षितपणे भारतात परत आले आहेत. ही बाब नुकतीच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आली, जेव्हा उत्तर मुंबईतील भाजप अध्यक्ष, वार्ड क्रमांक २४ चे गोविंद प्रसाद यांनी माहिती दिली की, ओमानमधील १८ भारतीय कामगार, ज्यात त्यांच्या एका नातेवाइकाचाही समावेश आहे, त्यांच्या नियोक्त्यांकडून शोषणाला बळी पडले असून अत्यंत दयनीय परिस्थितीत राहत आहेत.
या कामगारांना तातडीने मदत मिळावी म्हणून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण सर्वोच्च प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश दिले. त्यांच्या कार्यालयाने तात्काळ ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून तातडीच्या हस्तक्षेपाची विनंती केली. दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जलद कारवाई करत केवळ त्या १८ कामगारांचा शोध घेतला नाही तर अशाच परिस्थितीत असलेले आणखी १८ भारतीय देखील शोधून काढले. सर्व ३६ कामगारांना स्थानिक गुरुद्वारात हलविण्यात आले, जिथे त्यांना तात्पुरते आश्रय देण्यात आले. त्याचवेळी दूतावासाने त्यांच्या परतीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. काही दिवसांतच सर्व कामगारांना सुरक्षितपणे भारतात परत पाठविण्यात आले.हे कामगार ओमानमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधीच्या शोधात गेले होते. परंतु त्यांच्या नियोक्त्यांकडून त्यांच्यावर गंभीर अत्याचार झाले. त्यांचे वेतन पाच महिन्यांनीच अंशतः दिले.
ओमानमधून ३६ भारतीय कामगारांची सुरक्षित परतफेड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाची आणि परदेशातील प्रत्येक भारतीयाचे रक्षण करण्याच्या सरकारच्या दृढनिश्चयाची साक्ष आहे. अडचणीत असलेल्या भारतीयांची सेवा करणे हे केवळ कर्तव्य नाही तर ती एक जबाबदारी आहे. परदेशात कार्यरत असलेले आपले कामगार हे राष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांच्या परतीसाठी सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही.पियूष गोयल, केंद्रीय मंत्री