नवी दिल्ली : 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना एक वर्षांसाठी शांतता राखण्याचे बंधपत्र लिहून देण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आता सुटकेनंतर दीपके हे पुन्हा आंदोलन करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे 'सीजेपी'च्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडताच दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दीपके यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, जिथे त्यांना काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, या घडामोडींबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात आणि आसपास सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. कॅनॉट प्लेस येथे शुक्रवारी 'लहरा दो तिरंगा' मोर्चा आयोजित करण्यापूर्वी पोलिसांनी दीपके यांना दोन नोटिसा बजावल्या होत्या. ते घराबाहेर पडताच त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेण्यात आले.
शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता नियोजित असलेल्या मोर्चापूर्वी, नोटिसा बजावण्यासाठी २० हून अधिक पोलीस कर्मचारी दीपके यांच्या झंडेवालान येथील निवासस्थानी पोहोचले होते.
पहिली नोटीस त्यांना कनॉट प्लेस परिसरात निदर्शने, मिरवणूक किंवा रॅली काढण्यापासून रोखणारी होती. दुसरी नोटीस विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आली होती, जी दीपके तसेच 'सीजेपी'चे नेते सौरभ दास आणि आशुतोष रंका यांच्यावर लादलेल्या बंधपत्राच्या अटींशी संबंधित होती.
दुसऱ्या नोटीसमध्ये पुन्हा स्पष्ट केले की, या तिघांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेऊन न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यांना एक वर्षापर्यंत शांतता राखण्याचे आणि चांगले वर्तन करण्याचे निर्देश दिले होते.
१० ऑक्टोबर रोजी, नियोजित निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दीपके, दास आणि रांका यांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रत्येकी ५० हजार रुपयांचे जामीन बंधपत्र सादर केल्यानंतर आणि एक वर्षापर्यंत शांतता राखण्याचे व सुवर्तणूक ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
शुक्रवारी पोलिसांनी १५० हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले आणि मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले.
अटकेचे कारण काय?
१० ऑक्टोबर रोजी त्यांनी दिलेल्या शांतता राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'शांतता राखण्याच्या बंधपत्रात दिलेल्या आश्वासनाच्या आधारावर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अधिक तपशिलांसाठी आम्ही लेखी आदेशाची प्रतीक्षा करत आहोत.'
नेहा बोराची सुटका
नवी दिल्ली: ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत नजरकैदेसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोरांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर बोरांनी दिल्ली पोलीस आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. या ताब्यात घेण्याच्या कारवाईला त्यांनी 'बेकायदेशीर' संबोधले.