"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया (Photo-X)
राष्ट्रीय

"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली गेल्या काही आठवड्यांपासून देशभर आंदोलन सुरू होते.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी (दि. २५) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत, हा देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केल्यानंतर दिपके यांनी प्रतिक्रिया देताना, "आपण करून दाखवलं," अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

"आम्ही आता थांबणार नाही"

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपके यांनी हा "लोकशाहीचा विजय" असल्याचे म्हटले. मात्र, "आमच्या आणखी दोन मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. आम्ही आता थांबणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

दिपके म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. पण नीट-यूजी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे."

त्यांनी पुढे सांगितले, "दुसरी मागणी म्हणजे २० जुलै रोजी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याची जबाबदारी निश्चित करावी."

दिपके यांनी सरकारला इशारा देत, "लक्षात ठेवा, झुरळांशी पंगा घेऊ नका," असे वक्तव्य केले.

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा

नीट-यूजी २०२६ पेपरफुटीच्या प्रकरणाविरोधात, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी सीजेपीच्या नेतृत्वाखाली गेल्या काही आठवड्यांपासून देशभर आंदोलन सुरू होते.

दिल्लीतील जंतर-मंतर येथील या आंदोलनाला परीक्षा अनियमिततेनंतर मोठा वेग मिळाला. विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. अलिकडच्या काळातील युवकांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी हे एक मानले जात आहे.

केंद्र सरकारवर दबाव

सीजेपीने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. सुरुवातीला केंद्र सरकारने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला होता. सरकार आणि सीजेपी यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही हा मुद्दा प्रलंबितच राहिला होता.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय गाजला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेसह विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारवरील राजकीय दबाव सातत्याने वाढत गेला.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सादर केल्याची माहिती

धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात नीट-यूजी २०२६ वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याचे सांगितले.

पत्रात त्यांनी कथित अनियमिततेनंतर केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचाही उल्लेख केला. यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी, परीक्षा रद्द करणे, फेरपरीक्षा घेणे आणि भविष्यात परीक्षा संगणकाधारित (कॉम्प्युटर-बेस्ड) पद्धतीने घेण्याचा निर्णय यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि सार्वजनिक सेवेसाठी आपण कटिबद्ध राहू, असेही धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video