मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी (१० ऑक्टोबर) दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाचं आयोजन केलं होतं. या आंदोलनासाठी दिल्लीला पोहोचताच पोलिसांनी त्यांना विमानातच ताब्यात घेतलं. दरम्यान, याच दिवशी त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दिपके यांचं हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथे निधन झालं. रविवारी (११ ऑक्टोबर) पोलिसांच्या ताब्यातून सुटकेचे आदेश मिळाल्यानंतर दिपके यांनी कुटुंबासोबत राहण्यासाठी गावी परतत असल्याची माहिती 'एक्स'वरील पोस्टमधून दिली आहे. मात्र, आपण गावी जात असलो तरी सीजेपीचं आंदोलन मागे हटणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अभिजीत दिपके यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
अभिजीत दिपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत कुटुंबासोबत राहण्यासाठी गावी परतत असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं, “या दुःखाच्या प्रसंगी माझ्या कुटुंबासोबत राहण्यासाठी मी माझ्या गावी परतत आहे. सौरव आणि आशु थोड्याच वेळात दिल्लीत पत्रकार परिषद घेतील. कॉकरोच जनता पार्टी मागे हटणार नाही आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. १० ऑक्टोबर हा दिवस या हुकूमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून इतिहासात नोंदवला जाईल.”
शनिवारी विमानातच घेतलं होतं ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित अनियमिततांच्या विरोधात सीजेपीने शनिवारी (दि. १०) दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन पुकारलं होतं.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे मुंबईहून दिल्लीला पोहोचले होते. मात्र, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही विमानातच ताब्यात घेतलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
रविवारी सकाळी तिघांच्या सुटकेचे आदेश
शनिवारी ताब्यात घेण्यात आलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना रविवारी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर पुढील एक वर्ष शांततेचा भंग होईल असं कोणतंही कृत्य न करण्याच्या अटीवर तिघांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. यापूर्वी शनिवारी रात्री यूट्यूबर ध्रुव राठी यांचीही सुटका झाली होती.
दरम्याम आजीच्या निधनामुळे अभिजीत दिपके गावी परतत असले, तरी सीजेपीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या पत्रकार परिषदेत सीजेपीच्या पुढील आंदोलनाबाबत कोणती घोषणा केली जाते, याकडे आता लक्ष लागलं आहे.