

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांना दिलासा मिळाला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची आज रविवारी (दि. ११) विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याचीही शनिवारी रात्री सुटका झाली. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (SIR) विरोध करण्यासाठी CJP ने आज पुन्हा जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढण्याची हाक दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून CJP ने हे आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका
अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना रविवारी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर दंडाधिकाऱ्यांनी तिघांच्या सुटकेचे आदेश दिले. पुढील एक वर्ष शांततेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या नेत्यांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. कलम १२६ हे शांतता राखण्यासाठी हमीपत्र घेण्याशी संबंधित आहे, तर कलम १७० दखलपात्र गुन्हा घडण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक अटकेची तरतूद करते.
ध्रुव राठीची शनिवारी रात्री सुटका
प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी याला शनिवारी (१० ऑक्टोबर) सकाळी गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील सेंट्रल पार्क विहार परिसरातील राहत्या घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा राठीची सुटका करण्यात आली. यानंतर जंतर-मंतरवरील पुढील आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना पोलिसांनी त्याला दिल्याचेही वृत्त आहे.
विमानातूनच अभिजीत दिपकेंना घेतले ताब्यात
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे शनिवारी मुंबईहून दिल्लीला आले होते. त्यांचे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विमानातच या तिघांना ताब्यात घेतले. जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते दिल्लीला आले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली होती.
त्यानंतर रविवारी सकाळी या तिन्ही नेत्यांना दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ध्रुव राठीच्या सुटकेनंतर CJP च्या तीन प्रमुख नेत्यांनाही दिलासा मिळाला आहे.
आंदोलनादरम्यान हजारो जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त
शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. विविध राजकीय नेत्यांसह तीन हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. यापैकी अनेकांची शनिवारी रात्री सुटका करण्यात आली. जंतर-मंतर परिसरात मोठी गर्दी होऊ नये, यासाठी शहरातील विविध भागांत बॅरिकेडिंग करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लहान गटांमध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न केला.
या कारवाईदरम्यान विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि रेल्वे सेवांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरूनही वाद निर्माण झाला.
मेट्रो निर्बंधांवरून वाद
दिल्लीतील मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि रेल्वे सेवांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने आंदोलक आणि राजकीय नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
CJP चा आज पुन्हा मोर्चा
ध्रुव राठी आणि CJP च्या तीन नेत्यांची सुटका झाली असली, तरी पक्षाने आंदोलन मागे घेतलेले नाही. CJP ने रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. अभिजीत दिपके यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे हे आंदोलनाच्या पुढील नियोजनाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती आहे.
जंतर-मंतरवरील मोर्चाला प्रशासनाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि आंदोलनादरम्यान पुढे काय घडते, याकडे आता लक्ष लागले आहे.