(Photo-X/@PiyushGoyal)
राष्ट्रीय

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको

सध्याची ‘एआय’ क्रांती ही ‘वायटूके’च्या क्षणासारखी आहे. त्या वेळी जगभरात भीतीचे वातावरण होते; पण १ जानेवारी २००० नंतर भारतीय आयटी क्षेत्राने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Swapnil S

मुंबई : सध्याची ‘एआय’ क्रांती ही ‘वायटूके’च्या क्षणासारखी आहे. त्या वेळी जगभरात भीतीचे वातावरण होते; पण १ जानेवारी २००० नंतर भारतीय आयटी क्षेत्राने कधीच मागे वळून पाहिले नाही. मला ‘एआय’ हाही तसाच एक निर्णायक टप्पा वाटतो, असे उद्योग व व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उदयानंतर भारतीय आयटी क्षेत्रात नोकऱ्या कमी होतील, या भीतीला उत्तर देताना गोयल म्हणाले की, हे नवे तंत्रज्ञान भारतीय उद्योगांसाठी संधी वाढवणारे ठरेल. नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले तरी देशातील रोजगारांवर ‘एआय’चा प्रतिकूल परिणाम होईल, याची ‘मला अजिबात चिंता नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत जागतिक कंपन्यांनी ‘एआय’वर केलेल्या प्रचंड गुंतवणुकीची तुलना त्यांनी वर्ष २००० च्या सुमारास उद्भवलेल्या ‘वायटूके’ संकटाशी केली. त्या काळात शतक बदलामुळे संगणक प्रणाली बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती.

दिल्लीत झालेल्या ‘एआय’ इम्पॅक्ट समिटनंतर तसेच ३१५ अब्ज डॉलरच्या भारतीय आयटी क्षेत्राच्या सुसंगततेबाबत आणि सुमारे ६० लाख रोजगारांवरील संभाव्य परिणामाबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.

ते म्हणाले की, ‘आपण जितके तंत्रज्ञानाशी जोडले जाऊ, तितकी मानवी कौशल्ये आणि प्रतिभेची गरज अधिक भासेल. नवीन संधी उपलब्ध होतील.’ एआयमुळे अधिक संधी, चांगला नफा, आकर्षक प्रकल्प आणि निर्यात वाढीस चालना मिळेल. देशातील २३ लाख विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित शाखेतील पदवीधरांना याचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.

‘एआय’मुळे भारताचे जागतिक पातळीवर अधिक सखोल एकत्रीकरण होईल, असे सांगताना त्यांनी अलीकडेच देशाने केलेल्या किंवा जाहीर केलेल्या नऊ मुक्त व्यापार करारांचा उल्लेख केला. या मुक्त व्यापार करारांमुळे भारताला वस्तू, सेवा, कृषी उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि मजूरप्रधान वस्तू जागतिक बाजारपेठेत नेण्यास मदत होईल.

यामुळे आपण जागतिक मूल्य साखळ्या, नवोन्मेष जाळे आणि कौशल्य गतिशीलतेच्या चौकटीत अधिक समाविष्ट होऊ, असे ते म्हणाले.

व्यापार मंत्री पियुष गोयल यांची अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांशी चर्चा

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्यासोबत बैठक घेतली असून, दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याची माहिती दिली.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांचे स्वागत केले. व्यापार आणि आर्थिक भागीदारी विस्तारण्यासाठी अत्यंत फलदायी चर्चा झाली,’ असे गोयल यांनी म्हटले आहे.

नावीन्यपूर्ण कामामुळे देश विकसित होतो

भारताने ३८ विकसित देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असून हे देश जागतिक जीडीपीच्या दोन-तृतीयांश वाटा उचलतात. कोणताही देश स्वतःला वेगळे ठेवून विकसित झालेला नाही. जे देश नवोन्मेष करतात, जगाशी संवाद साधतात, स्पर्धा स्वीकारतात आणि कार्यक्षमता वाढवतात तेच आघाडीवर पोहोचतात, असे त्यांनी नमूद केले. चीनची प्रगती उल्लेखनीय असली तरी ती मुख्यतः कार्यक्षमता आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याच्या क्षमतेपुरती मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला ‘मानवी दृष्टिकोनातून’ आणि मूल्यव्यवस्थांच्या आधारावर प्रगती करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चीनकडून शिकणे गरजेचे- सज्जन जिंदाल

याच कार्यक्रमात उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी भारताने विस्ताराच्या बाबतीत चीनकडून शिकण्याची गरज असल्याचे सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पातील विलंबाचा उल्लेख करत त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला. आपण अजूनही बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी ४ ते ५ वर्षे दूर आहोत. चीनमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे बुलेट ट्रेन मार्ग कार्यरत आहेत. चीनकडून काय शिकायचे हे सरकारने ठरवले पाहिजे. आपले संबंध अधिक उंचीवर नेण्याची गरज आहे, असे जिंदाल म्हणाले.

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पक्षाच्या अधिवेशनात एकमताने झाली निवड

महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती! मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर; ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय माझे!

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांचा राजीनामा; लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत नाव आल्यानंतर पदत्याग, एलोइस ज्विंगी नवे CEO