नवी दिल्ली : एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन, नवनवीन शोध लावणाऱ्या मानवी शास्त्रज्ञांनी मानवी जीवन सुसह्य केले आहे. यासाठी मानवी शास्त्रज्ञांना दिवसेंदिवस बसून प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागतात. त्याचे निष्कर्ष तपासावे लागतात. आपले आयुष्य त्यासाठी खर्ची घालावे लागते. येत्या काळात मानवी शास्त्रज्ञांऐवजी ‘एआय’ शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत दिसायला लागणार आहे. दिल्ली आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी ‘आयला’ हा प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला जन्म दिला आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीतील संशोधकांनी डेन्मार्क आणि जर्मनीतील सहकाऱ्यांसह हा कृत्रिम शास्त्रज्ञ तयार केला आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या संशोधन लेखात या कृत्रिम शास्त्रज्ञाचे सविस्तर वर्णन केले आहे. सध्या ‘चॅटजीपीटी’ हे एआय मॉडेल्स प्रामुख्याने डिजिटल सहाय्यक म्हणूनच वापरले जाते. दस्तावेज तयार करणे, प्रश्नांची उत्तरे देणे आणि डेटा विश्लेषण करणे यापुरतेच त्यांचे काम मर्यादित होते. मात्र, आता संशोधकांनी ही मर्यादा मोठ्या प्रमाणात ओलांडत ‘AILA’ (आयला)
(आर्टिफिशयली इंटेलिजंट लॅब असिस्टंट) हा एआय एजंट विकसित केला आहे. हा एजंट प्रत्यक्ष प्रयोगशाळेत उतरून मानवी शास्त्रज्ञांप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वैज्ञानिक प्रयोग पार पाडू शकतो.
‘आयला’ हा माझ्या दैनंदिन प्रयोगात्मक कामांमध्ये मदत करतो आणि माझ्या संशोधनाचा वेग लक्षणीयपणे वाढवतो. यापूर्वी उच्चक्षमतेच्या आणि कमी आवाज असलेल्या प्रतिमा मिळवण्यासाठी मायक्रोस्कोपचे पॅरामीटर्स ऑप्टिमाइझ करायला संपूर्ण दिवस लागायचा. आता तेच काम अवघ्या ७ ते १० मिनिटांत पूर्ण होते, असे आंतरशाखीय संशोधन कॉलेजमधील पीएचडी संशोधक इंद्रजीत मंडल यांनी सांगितले.
हे संशोधन ‘ॲटोमिक फोर्स मायक्रोस्कोप’ (एएफएम) या अत्यंत प्रगत उपकरणावर केंद्रित होते. जे अतिशय सूक्ष्म पातळीवर पदार्थांचा अभ्यास करते. विशेष म्हणजे, ‘आयला’ हा कृत्रिम शास्त्रज्ञ आता या गुंतागुंतीच्या उपकरणावर नियंत्रण ठेवू शकतो, प्रयोगादरम्यान तत्काळ निर्णय घेऊ शकतो आणि निकालांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करू शकतो.
आयआयटी दिल्लीतील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व आणि यार्डी स्कूल ऑफ एआयचे प्राध्यापक अनुप कृष्णन म्हणाले, ‘पूर्वी एआय केवळ विज्ञानाबद्दल माहिती लिहिण्यात मदत करू शकत होता. आता तो प्रत्यक्ष विज्ञानाचे प्रयोग करू शकतो. त्यात प्रयोगांची रचना करणे, प्रत्यक्ष उपकरणांवर ते राबवणे, डेटा संकलित करणे आणि त्याचा अर्थ लावणे हे सर्व तो करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
आंतरशाखीय संशोधन कॉलेजमधील पीएचडी संशोधक इंद्रजीत मंडल यांनी सांगितले की, या संशोधनातून महत्त्वाच्या सुरक्षाविषयक बाबीही समोर आल्या आहेत. काही वेळा ‘एआय एजंट’ हा दिलेल्या सूचनांपासून विचलित होत असल्याचे आढळले. त्यामुळे प्रयोगशाळा अधिकाधिक स्वयंचलित होत असताना अपघात किंवा उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी मजबूत सुरक्षा उपायांची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ही प्रगती भारताच्या ‘एआय फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ उपक्रमाशी सुसंगत आहे. देशभरात एआय-आधारित संशोधनाला गती देण्यासाठी सरकारने अलीकडेच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन (एएनआरएफ) मार्फत निधी जाहीर केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृष्णन यांच्या मते, ‘आयला’सारखी तंत्रज्ञाने देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेसाठी परिवर्तनकारी ठरू शकतात. ‘स्वायत्त प्रयोगशाळा सहाय्यक प्रगत प्रयोगात्मक क्षमतांपर्यंत सर्वसामान्य संशोधकांचा प्रवेश सुलभ करू शकतात,’ असे त्यांनी सांगितले.
‘एआय’ शास्त्रज्ञाच्या कुशलतेवर प्रश्नचिन्ह
संशोधकांना असेही आढळले की, विज्ञानविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यात कुशल असणे म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगशाळेत विज्ञान करण्यातही ‘एआय’ तितकाच कुशल असेल असे नाही. मटेरियल सायन्सच्या चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी मॉडेल्स, त्वरित जुळवून घेण्याची गरज असलेल्या वास्तविक प्रयोगशाळेतील परिस्थितींमध्ये अडखळली. हे जणू काही वाहन चालवण्याचे नियम पुस्तकातून जाणून घेणे आणि प्रत्यक्ष शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर गाडी चालवणे यातील फरकासारखे आहे,’ असे आंतरशाखीय संशोधन कॉलेजमधील पीएचडी संशोधक इंद्रजीत मंडल यांनी स्पष्ट केले.