नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातप्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर सर्वच स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आता एअर इंडियाचे ‘सीईओ’ कॅम्पबेल विल्सन यांनी, विमानात कोणताही यांत्रिक बिघाड नव्हता, असा लगेच निष्कर्ष काढू नका, असे म्हटले आहे.
या अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, ‘डीजीसीए’च्या देखरेखीखाली एअर इंडियाच्या सर्व बोइंग ७८७ विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळून आले, असेही सीईओंनी सांगितले.
विल्सन म्हणाले की, आम्ही सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या सुचवल्या गेल्या तर त्याही पूर्ण करू. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना या अपघातावर घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन केले. तपास अजूनही सुरू आहे आणि संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणाले.