जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडील पुरामुळे नुकसान झालेल्या जनतेच्या पुनर्वसनासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले. शाह यांनी येथील पुरग्रस्त भागांचा दौरा केला.
गृहमंत्र्यांनी जम्मू विमानतळाजवळील मंगुचक गावाला भेट दिली. त्यांच्यासोबत राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, विरोधी पक्षनेते सुनील शर्मा तसेच भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष सत शर्मा आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शाह रविवारी रात्री जम्मूत पोहोचले होते. त्यांनी राजभवनात भेटीगाठी घेतल्यानंतर मंगुचक या सर्वाधिक प्रभावित गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
गावकऱ्यांशी संवाद साधताना शाह यांनी योग्य ती मदत व पुनर्वसनाची खात्री दिली. त्यांनी 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “आज मी जम्मूमधील मंगुचक गावाला भेट दिली. येथे मदत व बचावकार्य सुरू असून आपत्ती निवारण पथके वैद्यकीय सेवांसह मदत पोहोचवत आहेत. प्रभावितांच्या पुनर्वसनासाठी मोदी सरकार सर्व उपाययोजना करेल.”
यापूर्वी शाह यांनी बिक्रम चौकाजवळील तावी पुलावर थांबून नदीकाठावरील नुकसानीची पाहणी केली. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली.
मी आयुष्यात असा पूर पाहिलेला नाही. फ्रीज, एअरकंडिशनर, कपडे सर्व वाहून गेले. पुरामुळे माझ्या घरात आता वस्तूच राहिल्या नाहीत, असे मंगुचकचे रहिवासी भानसिंह यांनी गृहमंत्री शाह यांना सांगितले.
आणखी एक रहिवासी चेन दास यांनी सांगितले की, तो कसाबसा जीव वाचवू शकला. “संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. आम्हाला आनंद आहे की गृहमंत्री प्रत्यक्ष भेटले. आशा आहे की, असा पूर येणार नाही यासाठी पावले उचलेल. गावात नवीन वळण रस्त्याच्या बांधकामामुळे पूरस्थिती निर्माण झाली. असा दावा त्याने केला.
अमित शाह यांनी सलग तीन बैठका केल्या. यात नायब राज्यपाल सिन्हा, मुख्यमंत्री अब्दुल्ला, शर्मा, पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि केंद्र तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
शाह यांचा गेल्या तीन महिन्यांतील जम्मू दौरा हा दुसरा आहे. यापूर्वी २९ मे रोजी ते पहीलगाव दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने सीमेपार कारवाई केल्यानंतर जम्मूत आले होते. त्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.