

महादेवांच्या भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा पवित्र उत्सव साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिवभक्त उपवास, जप आणि रात्रभर जागरण करून भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात.
महाशिवरात्रीची तिथी आणि वेळ
चतुर्दशी तिथीची सुरुवात : १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ०५:०४
चतुर्दशी तिथीची समाप्ती : १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ०५:३४
व्रत १५ फेब्रुवारी रोजी पाळले जाईल आणि १६ फेब्रुवारीला पारण केले जाईल.
शिवलिंगावर जलाभिषेक कधी करावा?
महाशिवरात्रीला रात्र चार प्रहरांमध्ये विभागली जाते. प्रत्येक प्रहरात शिवपूजा आणि अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे.
प्रथम प्रहर : १५ फेब्रुवारी सायं. ०६:११ ते रात्री ०९:२२
द्वितीय प्रहर : रात्री ०९:२३ ते १६ फेब्रुवारी १२:३४ मध्यरात्र
तृतीय प्रहर : १२:३५ ते पहाटे ०३:४६
चतुर्थ प्रहर : पहाटे ०३:४६ ते सकाळी ०६:५९
या वेळांपैकी कोणत्याही प्रहरात जल, दूध किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करता येतो.
महाशिवरात्रीचा पूजाविधी
ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे
शिवलिंगावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा
बेलपत्र, धतुरा, भस्म, चंदन, अक्षता, पान-सुपारी, लवंग, वेलची, कमलगट्टा आणि पांढरी फुले अर्पण करावीत
धूप-दीप लावून आरती करावी
‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजप आणि शिवस्तोत्रांचे पठण करावे
महाशिवरात्री का साजरी करतात?
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला, असे मानले जाते. तसेच समुद्रमंथनातून निर्माण झालेले विष प्राशन करून भगवान शंकरांनी सृष्टीचे रक्षण केले, ही कथाही याच दिवशी जोडली जाते. त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्री केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक मंदिरांमध्ये रात्रभर कीर्तन, भजन आणि नृत्य उत्सव आयोजित केले जातात. कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या मंदिरांमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होतात.
महाशिवरात्री हा केवळ उत्सव नसून भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. योग्य मुहूर्तावर अभिषेक करून आणि मनोभावे पूजा केल्यास भगवान शंकरांची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे.
हर हर महादेव!