आंध्र प्रदेश : शाळेत वर्ग सुरू असताना एका तरुणाने हातात करवत घेऊन थेट वर्गात प्रवेश केला आणि दहावीच्या विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी पुढे आलेली तिची मैत्रीणही जखमी झाली आहे. अनंतपूर जिल्ह्यातील राप्तडू येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
माध्यमांच्या वृत्तानुसार, अनंतपूर जिल्ह्यातील राप्तडू येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गात शिकणारी गोपिका ही विद्यार्थिनी उपस्थित होती. त्याचवेळी हेमंत नावाचा तरुण झाडं कापण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक करवत (चेनसॉ) घेऊन वर्गात शिरला. त्याने अचानक गोपिकावर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
गोपिकाला वाचवण्यासाठी तिची वर्गमैत्रीण लक्ष्मी पुढे आली. मात्र, या हल्ल्यात लक्ष्मीलाही दुखापत झाली. वर्गात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. हल्ल्यानंतर आरोपी शाळेतून पळून गेला. शिक्षकांनी तातडीने दोन्ही जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हल्ल्यामागचं कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी हेमंत हा गोपिकाचा दूरचा नातेवाईक आहे. तो काही काळापासून तिला त्रास देत असल्याचा आरोप आहे. गोपिकाने त्याला आपल्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. तसेच त्याच्या वागण्याबाबत आई-वडिलांना सांगण्याचा इशाराही दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने शाळेत जाऊन तिच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, हल्ल्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर श्री सत्यसाई जिल्ह्यातील धर्मावरमजवळ पोलिसांनी हेमंतला ताब्यात घेतलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश
या घटनेबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गोपिकाच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच तिला योग्य उपचार मिळावेत, असे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा वेगाने तपास करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेच्या वर्गातच विद्यार्थिनीवर झालेल्या या हल्ल्यामुळे शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.