राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव; सभागृहाचे कामकाज शनिवारपर्यंत तहकूब

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीत ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच खेळी खेळली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी केजरीवाल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे, ‘आप’कडे एकूण ७० पैकी ६२ आमदार असूनही केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे.

आम आदमी पक्षाच्या एकाही आमदाराने पक्षांतर केलेले नाही, हे जनतेला दाखवून द्यायचे आहे, असे त्यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. सभागृहाचे कामकाज शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आता शनिवारी १७ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे.

केजरीवाल यांनी ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्येही विश्वासदर्शक ठराव आणला होता. यावेळी केजरीवाल यांनी ‘आप’च्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपवर केला होता. यानंतर भाजपने आपवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, तर दिल्ली पोलिसांनी केजरीवालांना नोटीस पाठवून याचे पुरावे मागितले होते.

केजरीवालांना ईडीने अनेक नोटिसा पाठवल्या आहेत. परंतु ते ईडीसमोर हजर झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आपल्याकडे २ आमदारांनी याचा खुलासा केल्याचे म्हटले होते. ‘माझ्याकडे दोन आमदार आले होते, त्यांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली जाईल,’ असे सांगितले होते. त्या लोकांनी २१ आमदारांना आपल्याकडे वळविले आहे. २५ कोटी रोख आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या लोकांनी अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस केलेले आहे. माझ्या माहितीनुसार, सर्व २१ आमदारांनी त्यांना नकार दिला आहे, असे केजरीवाल म्हणाले होते.

“अबकारी घोटाळा हा काही घोटाळा नाही. खोट्या केसखाली सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत ते आयुष्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत, आमचा एकही आमदार फुटलेला नाही,” याचाही पुनरुच्चार केजरीवाल यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळी केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त