आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा 'कमळ'; भाजपचा दणदणीत विजय  
राष्ट्रीय

आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा 'कमळ'; भाजपचा दणदणीत विजय

आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ८२ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने १९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपची सहकारी 'बोडो पीपल्स फ्रंट'ने १० जागा जिंकल्या आहेत. 'असम गण परिषदे'ने १० ठिकाणी विजय मिळवला आहे. तसेच अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील 'रायजोर दल'ने २ ठिकाणी विजय मिळवला आहे.

Swapnil S

गुवाहाटी (पीटीआय) : आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ८२ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने १९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपची सहकारी 'बोडो पीपल्स फ्रंट'ने १० जागा जिंकल्या आहेत. 'असम गण परिषदे'ने १० ठिकाणी विजय मिळवला आहे. तसेच अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील 'रायजोर दल'ने २ ठिकाणी विजय मिळवला आहे.

भाजपचे आसाममधील मंत्री पियूष हजारिका यांनी जागिरोड मतदारसंघातून ९३,५८४ मतांच्या फरकाने काँग्रेसच्या बुलूदास यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. तसेच मंत्री रणोज पेगू यांनी धेमाजी मतदारसंघातून ३२,२२९ हून अधिक मतांनी विजय मिळवला. 'बोडो पीपल्स फ्रंट'चे नेते चरण बोरो यांनी माजबाट मतदारसंघातून जेएमएमच्या उमेदवाराचा ५५,००० मतांच्या फरकाने पराभव करून आपली जागा राखली आहे.

माजुली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार भुवन गाम यांनी ४३,०२४ मते मिळवलेल्या काँग्रेसच्या इंद्रनील पेगू यांचा ३५,३०० मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय नोंदवला आहे. बेहाली मतदारसंघातून मुनिंद्र दास यांनी ८७,२२४ मते मिळवत सीपीआय एमएल लिबरेशनच्या ज्ञानेंद्र सरकार यांचा ६०,७०३ मतांनी पराभव केला आहे; सरकार यांना २६,५२१ मते मिळाली. २०२३ मधील पुनर्रचनेत तयार झालेल्या टांगला मतदारसंघात भाजपचे बिकांन चंद्र डेका यांनी ८४,३०९ मते मिळवून काँग्रेसच्या रोहित परिगा यांचा ५४,६०१ मतांच्या फरकाने पराभव केला.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा विजयी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जालुबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार बिदिशा निओग यांच्यावर ६३ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. भाजप नेते सरमा सलग सहाव्यांदा हा मतदारसंघ राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सरमा यांनी १९९६ मधील पहिली निवडणूक गमावली होती, मात्र २००१ पासून त्यांची विजयाची मालिका कायम आहे आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आहे. २०२१ मध्ये त्यांनी १,०१,००० मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला होता.

आसाममध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष

एनडीए १२६ पैकी ९८ जागांवर आघाडीवर असल्याचे जाहीर झाल्यानंतर सोमवारी दुपारी आसाम भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील बासिष्ठा येथील 'वाजपेयी भवन' येथे भगवे झेंडे हातात घेऊन ढोल वाजवले, नृत्य केले आणि एकमेकांना गुलाल लावला. यावेळी 'जोई आई आसोम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या.

जोरहाटमध्ये काँग्रेसचे गौरव गोगोई पराभूत

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचा जोरहाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे हितेन्द्रनाथ गोस्वामी यांनी २३,१८२ मतांनी पराभव केला. गोगोई यांना ४६,२५७ मते मिळाली, तर गोस्वामी यांनी ६९,४३९ मते मिळवून सलग तिसऱ्यांदा हा मतदारसंघ राखला आहे. विधानसभा निवडणुकीत गोगोई यांनी पहिल्यांदाच पदार्पण केले आहे. याउलट, गोस्वामी यांनी तीन वेळा 'एजीपी'चे आमदार आणि दोन वेळा भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे.

सुवेंदू अधिकारी : ममतांचे उजवे हात ते 'भावी मुख्यमंत्री'

मुक्काम पोस्ट तमिळनाडू : वारेमाप आश्वासने पूर्ण करणे आव्हानात्मक

मुक्काम पोस्ट पश्चिम बंगाल : ममतांचा बालेकिल्ला ढासळला

मुक्काम पोस्ट केरळ : 'यूडीएफ'चे वादळ; केरळमध्ये राजकीय सत्तापालट; काँग्रेसचे पुनरागमन, भाजपचे खाते उघडले

मुक्काम पोस्ट आसाम : भाजपची पकड आणखी मजबूत