बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले X
राष्ट्रीय

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

संपूर्ण देशाला उत्कंठा लावणाऱ्या, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळ या चार राज्यांच्या व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. आसामसहित बंगालवर कब्जा करून पूर्व भारतावर भाजपने निर्णायक वर्चस्व मिळवले असले तरी त्या पक्षासाठी दक्षिणेची वाट अजूनही बिकटच आहे हे त्यातून स्पष्ट झाले.

Swapnil S

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला उत्कंठा लावणाऱ्या, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळ या चार राज्यांच्या व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. आसामसहित बंगालवर कब्जा करून पूर्व भारतावर भाजपने निर्णायक वर्चस्व मिळवले असले तरी त्या पक्षासाठी दक्षिणेची वाट अजूनही बिकटच आहे हे त्यातून स्पष्ट झाले. सर्वाधिक लक्ष असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडे गेल्या १५ वर्षांपासून असलेले सत्तेचे सोपान हिसकावून घेतले. आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज करीत हॅटट्रिक केली आहे, तर दक्षिणेत पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीकेने बाजी मारली. केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवून काँग्रेसप्रणित यूडीएफने जोरदार मुसंडी मारली. तर पुद्दुचेरीमध्ये अपेक्षेनुसार भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण पाचपैकी तीन राज्यांमध्ये सत्ताबदल होणार आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजता सर्व राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या दोन अडीच तासांत कल जवळपास स्पष्ट झाले. त्यात चार राज्यांतील चित्र एक्झिट पोल्सच्या अंदाजाबरहुकूम असल्याचे दिसले. मात्र तमिळनाडूमध्ये सुमारे दोन तासांनी एकदम उलटफेर झाला व टीव्हीकेने जोरदार मुसंडी मारली.

बंगालमध्ये बराच काळ भाजप व तृणमूल यांच्यात चुरस कायम होती. त्यात भाजप पुढे होता. मात्र ममता हे कल सहजासहजी मान्य करण्यास तयार नव्हत्या. तृणमूल पुढे आहे अशा जागांची माहिती जाहीर करण्यात निवडणूक आयोग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मतदान केंद्र शेवटपर्यंत सोडू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मात्र दुपारी एकनंतर भाजप मोठे बहुमत मिळवणार हे जवळपास नक्की झाले.

तमिळनाडूमध्ये आरंभीच्या कलांमध्ये द्रमुक पुढे होता. पण टीव्हीके झपाट्याने पुढे सरकू लागताच, द्रमुकच्या कार्यालयांमधील गर्दी आटू लागली. अनेकांनी तेथील टीव्ही संच बंद केले व निकालांसाठी उभारलेले तंबू गुंडाळले.

विजय यांची युती कोणाशी ?

दरम्यान, टीव्हीके १०७ जागांवर आघाडी घेतल्याने बहुमतापासून ११ जागा दूर आहे. अशा स्थितीत विजय कोणाशी आघाडी करणार याची उत्सुकता आहे. विजय यांच्या वडिलांनी सत्तेसाठी पहिला पत्ता खोलला आहे. विजय यांचे वडील एस. चंद्रशेखर यांनी विजय काँग्रेसशी आघाडी करू शकतात, असं म्हटलं आहे. आतापर्यंत काँग्रेसने चुकीच्या पक्षासोबत आघाडी केली होती. आम्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहोत, असे म्हटले होते. दुसरीकडे प्रचारात विजय यांनी प्रचारात खरी कॉग्रेस आपल्यासोबत असून तमिळनाडू काँग्रेस डीएमकेच्या खिशात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता विजय काँग्रेसशी जुळवून घेतात की, एआयडीएमकेशी युती करतात हा सुद्धा मुद्धा आहे. प्रादेशिक मुद्यांवर ठाम राहणार की सत्तेसाठी एनडीएच्या जवळ जाणार याची सुद्धा उत्सुकता आहे.

आसाम - पहिल्यांदाच स्वबळावर

आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी जनतेचे आभार मानले. हा विजय म्हणजे सरकारच्या चांगल्या कामाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर दिलेल्या जोराचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसवर टीका करताना सरमा म्हणाले की, काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले आणि गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचा निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा पराभव झाला. भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सरमा म्हणाले, "सत्ताधारी आघाडीसाठी हा अभूतपूर्व विजय आहे. आसाममध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे."

डाव्यांचा पराभव

आजच्या निकालाने डाव्या पक्षांच्या हातातील अखेरचे राज्यही गेले आहे. यापूर्वी बंगाल व त्रिपुरामध्ये दीर्घ काळ सत्ता गाजवल्यावर त्यांचा पराभव झाला होता. आता केरळमध्येही त्यांची सत्ता गेली.

भवानीपूरमध्ये ममता पराभूत

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा सुमारे १५,००० मतांच्या फरकाने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. सातव्या फेरीअखेर त्या १७,००० मतांनी पुढे होत्या. मात्र, दहाव्या फेरीनंतर चित्र बदलू लागले आणि सुवेंदू अधिकारी यांनी ही तफावत वेगाने कमी केली. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये अधिकारी यांनी मोठी मुसंडी मारत ममता दीदींना मागे टाकले. निकालाचे चित्र स्पष्ट होताच ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर कडक शब्दांत टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून ही निवडणूक 'चोरली' आहे, असा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणी मतमोजणी हेतुपुरस्सर थांबवण्यात आली होती. केंद्रीय सुरक्षा दलांचा वापर करून तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे.

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

महाराष्ट्रात भाजप प्रवेशाकरिता लागतील रांगा

प्रादेशिक पक्षांचा दिवा विझण्याच्या मार्गावर

मे महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ५ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत